![]()
मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या आरोग्यावर, अभ्यासावर आणि मानसिक विकासावर होत असलेल्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा, भिंगार येथे ‘मोबाइलचे दुष्परिणाम’ या विषयावर प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा प्रभाव इतका झाला की पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी “आम्ही मोबाइल वापरणार नाही” असा संकल्प केला. पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी मोबाइलच्या अतिवापरामुळे होणारा चिडचिडेपणा, अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, वेळेचा अपव्यय, मैदानी खेळांपासून वाढणारे अंतर तसेच डोळे व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर आधारित प्रभावी नाटिका सादर केली. सोप्या भाषेतील संवाद आणि वास्तववादी प्रसंगांमुळे विद्यार्थ्यांवर या नाटिकेचा सकारात्मक परिणाम झाला. नाटिका संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने मोबाइलचा अनावश्यक वापर टाळण्याची, अभ्यास, वाचन, मैदानी खेळ आणि सर्जनशील उपक्रमांना अधिक वेळ देण्याची शपथ घेतली. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव आणि दृढनिश्चय उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. शाळेच्या या उपक्रमाचे पालक आणि शिक्षणप्रेमींनीही कौतुक केले. डिजिटल युगात मोबाइलचा योग्य आणि मर्यादित वापर करण्याची सवय लहानपणापासूनच लागावी, या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला असून इतर शाळांसाठीही अनुकरणीय उपक्रम म्हणून पाहिला जात आहे. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापिका उज्वला कळमकर, बालवाडी इन्चार्ज अर्चना गायकवाड यांनी कौतुक केले. या नाटिकेत कल्याणी धाडगे, शोभा गायके, सुजाता अंगरके, वैशाली विधाते यांनी सहभाग घेतला होता.
Source link
‘आम्ही मोबाइल वापरणार नाही!’ शाळेतील विद्यार्थ्यांचा दृढ संकल्प:नाटिकेच्या माध्यमातून मोबाइलच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन