![]()
मुंबईतील मुसळधार पाऊस, रस्त्यांवरील पाणी साचणे, साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरण आणि महापालिकेच्या कामकाजावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता नवे वळण मिळाले आहे. साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणात भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम हे हसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावरूनच आज राज ठाकरे यांनी या असंवेदनशीलतेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. आता अमित साटम यांनी पावसामुळे जलमय झालेल्या रोडची पाहणी करताना विरोधकांवर निशाणा साधला. “आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतो, घरात बसून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना उत्तर देण्याची गरज नाही,” असा टोला त्यांनी लगावला. साटम यांच्या या वक्तव्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तत्काळ पलटवार करत, “तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फिल्डवर काम करणं नाही; परिणाम काय झाला हे सांगा,” असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली प्रशासनावरील चर्चा आता भाजप आणि मनसे यांच्यातील शाब्दिक संघर्षात बदलल्याचे चित्र दिसत आहे. विरोधकांच्या टीकेला साटम यांचे प्रत्युत्तर मुंबईतील पावसाच्या व्यवस्थापनावरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत असल्याबाबत विचारले असता साटम म्हणाले की, ज्यांनी तब्बल 25 वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली, त्यांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाय केला नाही. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, प्रशासन, वाहतूक पोलीस आणि महापालिका एकत्रितपणे वाहतूक व पाणी निचऱ्याचे नियोजन करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात अमित साटम यांच्या हसण्यावरून टीका केली होती. त्यावर उत्तर देताना साटम म्हणाले की, त्यांच्या विधानाचा संदर्भ बदलून त्याचा विपर्यास केला जात आहे. “मी याबाबत आधीच स्पष्टीकरण दिले आहे. विरोधक मुद्दाम चुकीचा अर्थ लावत आहेत. प्रत्यक्षात आम्ही घटनास्थळी जाऊन काम करत आहोत,” असे ते म्हणाले. “आम्ही पोस्ट लिहित नाही, प्रत्यक्ष काम करतो” साटम यांनी विरोधकांवर आणखी टीका करत सांगितले की, पावसाळ्यात ते स्वतः अधिकाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून पाहणी करत आहेत. त्यांच्या मते, केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रत्यक्ष नागरिकांच्या अडचणी समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी दावा केला की, महापालिकेतील कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात असून त्यामुळेदेखील काही राजकीय पक्ष त्यांच्यावर टीका करत आहेत. रोडवरील पाणी साचण्यामागे काय कारण? रोडवरील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर अमित साटम यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी सांगितले की, हा परिसर सखल भागात असल्याने आणि भरतीच्या काळात नाल्याची पातळी वाढत असल्यामुळे पावसाचे पाणी त्वरित वाहून जाऊ शकत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची उंची वाढवणे हा देखील व्यवहार्य पर्याय नाही, कारण त्यामुळे परिसरातील अनेक इमारतींचा स्तर रस्त्यापेक्षा खाली जाईल. त्यामुळे सध्या पंपांच्या माध्यमातून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असला तरी भरतीमुळे त्यालाही मर्यादा येत आहेत. साटम यांनी सांगितले की, विरा देसाई रोड परिसरासाठी महापालिकेने तीन विशेष पंप कार्यरत ठेवले आहेत. हे पंप रस्त्यावर साचलेले पाणी नाल्यात सोडत आहेत. मात्र नाल्याची पातळीच वाढल्यास पाणी पुन्हा परत येण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनते. यासाठी मुंबई महानगरपालिकेने आयआयटी बॉम्बेसोबत मिळून शहरासाठी पूरनियंत्रणाचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला असून तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला. स्टँडिंग कमिटीच्या मुद्द्यावरही मोठा दावा साटम यांनी दावा केला की, महापालिकेतील स्थायी समितीच्या कामकाजात पूर्वी असलेली राजकीय समजूत त्यांनी बंद केली. त्यामुळे काही राजकीय पक्ष नाराज असून त्याच कारणातून त्यांच्यावर लक्ष्य केले जात आहे. मुंबई महानगरपालिका अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिराशी संबंधित आंदोलनाबाबत विचारले असता साटम म्हणाले की, आता त्यांना राम आठवू लागला आहे. त्यांनी या आंदोलनावरही अप्रत्यक्ष टीका केली. संदीप देशपांडेंचा साटम यांच्यावर जोरदार पलटवार दरम्यान, अमित साटम यांच्या वक्तव्याला उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपवर तीव्र टीका केली. देशपांडे म्हणाले, “तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फिल्डवर काम करणं नव्हे. प्रत्यक्ष परिणाम काय झाला, हे सांगणे अधिक महत्त्वाचे आहे.” त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, नालेसफाईची पाहणी करूनही मुंबईत झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तसेच उघड्या मॅनहोलमध्ये पडून नागरिकाचा जीव गेला. मग फिल्डवर राहून नेमके काय साध्य झाले? “परिणाम दाखवा, फोटोसेशन नको” देशपांडेंनी आरोप केला की, केवळ घटनास्थळी भेट देऊन किंवा पाण्यात फिरून समस्या सुटत नाहीत. नागरिकांना प्रत्यक्ष परिणाम हवा आहे. त्यांनी स्थायी समितीबाबत साटम यांनी केलेल्या दाव्यालाही फेटाळून लावत, “त्यावेळी ते स्वतःही समितीत होते. त्यामुळे आता इतरांवर आरोप करण्याऐवजी स्वतःच्या भूमिकेचाही खुलासा करावा,” अशी मागणी केली. पावसाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले मुंबईतील मुसळधार पाऊस, पाणी साचणे, झाड कोसळण्याच्या घटना आणि मॅनहोल दुर्घटनांमुळे आधीच प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता त्यावरून भाजप, मनसे आणि इतर विरोधी पक्षांमध्ये शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाच्या उपाययोजना आणि विरोधकांच्या टीकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संबंधित बातमी वाचा… साकीनाका मॅनहोल दुर्घटना:अमित साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरेंचे फडणवीसांना खरमरीत पत्र, तर राऊतांचा ‘मौत के सौदागर’ म्हणत घणाघात साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या गंभीर घटनेवर भाजपचे मुंबईतील आमदार अमित साटम हे हसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून भाजपच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपला ‘मौत के सौदागर’ म्हणत लक्ष्य केले आहे. येथे वाचा सविस्तर बातमी मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, 4 अधिकाऱ्यांचे निलंबन मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा… साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत मोठा खुलासा:सुरक्षिततेसाठी मॅनहोल उघडला, पण नियमच पाळले नाहीत; पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची कबुली साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई महापालिका प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे. ही दुर्घटना मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी जाळी बसविण्याचे काम सुरू असतानाच घडली, मात्र कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्यात आले नाही, अशी कबुलीच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने संबंधित चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
Source link
'आम्ही रस्त्यावर, ते फक्त पोस्ट टाकतात':अमित साटमांचा राज ठाकरेंना टोला, संदीप देशपांडेंचा पलटवार- तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फिल्डवर असणं नव्हे