Headlines

पावसाचा कहर:वसईत पुरात अडकलेल्या नागरिकांची थरारक सुटका, मुंबई-ठाणे-पालघर जलमय, महामार्गांवर वाहतूक विस्कळीत




महाराष्ट्रात मान्सूनने आता रौद्ररूप धारण केले असून, मुंबई महानगर प्रदेश (MMR), पालघर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार, सातारा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सखल भाग जलमय झाले आहेत. रस्ते, रेल्वे, बाजारपेठा आणि निवासी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई महानगर प्रदेश आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. विविध ठिकाणी बचाव पथके तैनात करण्यात आली असून अग्निशमन दल, पोलीस, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. वसईतील सकवारमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांची थरारक सुटका सर्वाधिक गंभीर परिस्थिती वसई-विरार परिसरात निर्माण झाली. वसई पूर्वेतील सकवार भागात पावसाचे पाणी झपाट्याने वाढल्याने अनेक घरे आणि परिसर पाण्याखाली गेले. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या या भागात काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले. माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका, तहसील प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या साहाय्याने धोकादायक परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, 13 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, तर अग्निशमन विभागाने दुसऱ्या बचाव मोहिमेत दोन लहान मुले, दोन महिला आणि एका पुरुषासह पाच जणांना छतावरून सुरक्षित स्थळी हलवले. परिसरातील इतर ठिकाणीही काही नागरिक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य रात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आले. अग्निशमन विभागाचा इशारा; अनेक भागांत पूरस्थिती अग्निशमन अधिकारी विशाल शिर्के यांनी सांगितले की, गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिसरात सतत पाऊस सुरू आहे. मात्र गेल्या २४ तासांत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नाले तुडुंब भरले आणि अनेक भागांत पाणी शिरले. सकवार परिसरात पुराचे पाणी थेट घरांमध्ये घुसल्याने अनेक नागरिक छतावर आश्रय घेण्यास भाग पडले. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करत आहेत. पालघरमध्ये शाळा-कॉलेजांना सुट्टी रेड अलर्ट लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकारी इंदू राणी जाखर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतही दुपारच्या सत्रासाठी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. नालासोपारा, वसंत नगरी, तुळिंज परिसर जलमय वसई-विरारमधील नालासोपारा, वसंत नगरी, तुळिंज, अलायन्स हॉस्पिटल रोड आणि मधुबन परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अनेक गृहसंकुलांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी वाहनांची वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक विस्कळीत मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे अनेक मालवाहू ट्रक आणि इतर वाहने अडकली. काही ठिकाणी वाहतूक संथ झाली असून प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत अंधेरी सबवे बंद, अनेक रस्ते जलमय मुंबईत सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले. अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने सकाळपासून वाहतूक बंद ठेवावी लागली. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. सबवे परिसरातील अनेक दुकानांमध्येही पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. मुंबई पोलिसांचा मदतीचा हात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मुंबई पोलीसही रस्त्यावर उतरले आहेत. विविध भागांत पोलीस कर्मचारी नागरिकांना सुरक्षित मार्ग दाखवत असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम करत आहेत. वाहतूक नियंत्रणाबरोबरच नागरिकांना धोकादायक भागात जाण्यापासून रोखण्यासाठीही पोलीस प्रयत्न करत आहेत. चांदीवलीत मनसेचे अनोखे आंदोलन मुंबईतील चांदीवली परिसरात गुडघाभर पाणी साचल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन केले. काही कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून टायरमध्ये बसत प्रशासनाच्या पावसाळी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नवी मुंबईत वाहतुकीवर मोठा परिणाम नवी मुंबईतील तुर्भे स्टेशनजवळ ठाणे-बेलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. कार्यालयीन वेळेत हजारो वाहनचालकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. भिवंडीत बाजारपेठांमध्ये पाणी, दुकानदारांचे नुकसान भिवंडीमध्येही मुसळधार पावसामुळे अनेक बाजारपेठा पाण्याखाली गेल्या. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भिवंडी महापालिकेने खबरदारी म्हणून जलमय भागांमध्ये बॅरिकेड्स आणि दोरखंड लावून नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखण्यास सुरुवात केली आहे. साताऱ्यात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण आणि पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून महाबळेश्वर, नवजा आणि कोयना परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी येत असून धरणात सध्या सुमारे २५ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन राज्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नदीकाठ, डोंगराळ भाग, सखल परिसर, पूल, नाले आणि पाणी साचलेल्या रस्त्यांवर जाणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासन, हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितीवर प्रशासनाची युद्धपातळीवरील नजर मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अग्निशमन दल, एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन, महापालिका, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके सतत गस्त घालत आहेत. ज्या भागांत पाणी साचले आहे किंवा पूरस्थिती निर्माण झाली आहे, तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम वेगाने सुरू असून, हवामानाचा पुढील अंदाज लक्षात घेता प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली आहे. येथे वाचा सविस्तर बातमी 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस-वादळाचा धोका:गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर अपेक्षेपेक्षा जास्त असून, येत्या 6 तारखेपर्यंत हे संकट कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *