Headlines

लोहगड बदनामीविरोधात गिर्यारोहण महासंघ आक्रमक:किल्ल्याची बदनामी थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या




लोहगड किल्ल्यावर नुकत्याच घडलेल्या गुन्हेगारी घटनेनंतर समाजमाध्यमांवर किल्ल्याची बदनामी सुरू झाली आहे. यावर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने तीव्र आक्षेप घेतला आहे. महासंघाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. महासंघाच्या मते, लोहगड हा केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा तो साक्षीदार असून लाखो शिवप्रेमी आणि गिर्यारोहकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. अशा पवित्र किल्ल्याची ओळख एखाद्या गुन्हेगारी घटनेशी जोडणे किंवा त्याला नवीन नाव देणे हा इतिहास आणि जनभावनांचा अवमान आहे. गेल्या काही दिवसांपासून लोहगडावरील एका कड्याचा “सिया पॉइंट” असा उल्लेख समाजमाध्यमे आणि गुगल मॅपवर केला जात आहे. यामुळे तिथे केवळ उत्सुकतेपोटी नागरिकांची गर्दी वाढत आहे. एखाद्या गुन्हेगारी घटनेला पर्यटनाचे स्वरूप येणे दुर्दैवी असल्याचे महासंघाने म्हटले आहे. याव्यतिरिक्त, किल्ल्यांवरील व्यावसायिक प्री-वेडिंग शूट, फॅशन शूट, रील्स आणि जाहिरातींचे चित्रीकरण यांवरही महासंघाने तीव्र आक्षेप घेतला आहे. यासाठी शासनाने स्पष्ट नियमावली आणि कडक आचारसंहिता लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये “सिया पॉइंट” सह सर्व आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारे डिजिटल उल्लेख तात्काळ हटवणे, गुगल मॅप व इतर प्लॅटफॉर्मवरील चुकीची नामकरणे रद्द करणे, ऐतिहासिक वारशाची बदनामी करणाऱ्या डिजिटल आशयाविरुद्ध स्वतंत्र धोरण तयार करणे यांचा समावेश आहे. तसेच, गड-किल्ल्यांवरील व्यावसायिक प्री-वेडिंग शूट, रील्स, जाहिराती व तत्सम चित्रीकरणासाठी स्पष्ट नियमावली जाहीर करावी आणि ऐतिहासिक वारशाचे पावित्र्य राखण्यासाठी दीर्घकालीन राज्यस्तरीय धोरण आखण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष हृषीकेश यादव आणि सचिव डॉ. राहुल वारंगे यांनी शासनाला यावर तात्काळ पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. हेही वाचा.. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, नार्कोटेस्टबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *