![]()
आषाढी एकादशीपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगाराला नव्या ५ बस मिळाल्या आहेत. या बस उद्यापासून नियमित प्रवासी सेवेत दाखल होणार असून ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा लाभ मिळणार आहे. शेवगाव व पाथर्डी आगारासाठी प्रत्येकी १० नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात शेवगाव आगारासाठी ५ नवीन बस मंजूर करण्यात आल्या असून त्या आता आगारात दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसही दोन्ही आगारासाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत. सध्या शेवगाव आगारात ५२ बस कार्यरत असून या बसमधून दरवर्षी सुमारे सहा लाख प्रवासी प्रवास करतात. यापैकी अनेक बस जुन्या झाल्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन नवीन बस उपलब्ध करून देण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वीही आमदार राजळे यांच्या प्रयत्नांतून बीएस-६ प्रकारातील १० नवीन बस शेवगाव आगाराला मिळाल्या होत्या. त्यामध्ये ११ फेब्रुवारी २०२५ रोजी ५ बस आणि ५ मार्च २०२५ रोजी आणखी ५ बस आगारात दाखल झाल्या होत्या. आता नव्याने ५ बस दाखल झाल्याने शेवगाव आगाराच्या ताफ्यात आणखी भर पडली आहे. यावेळी आ. राजळे म्हणाल्या, राज्य शासनाच्या माध्यमातून शेवगाव आगाराचे शेड व बसस्थानकाचे काम पूर्णत्वास आले आहे. नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ बस विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीचा विचार करून तयार करण्यात आल्या असून सुरक्षितता, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Source link
आषाढीच्या मुहूर्तावर शेवगाव आगाराची नवी भरारी; ताफ्यात 5 आधुनिक बस