![]()
शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि तांत्रिक गोंधळामुळे रास्तभाव दुकानदारांसह शिधापत्रिकाधारक लाभार्थी कमालीचे त्रस्त झाले आहेत. एप्रिल महिन्याचे धान्य गोदामात पडून असतानाही पीओएस मशीनमधून डेटा गायब झाल्याने वाटप रखडले आहे. इतर प्रलंबित मागण्यांसाठी वरुड तालुका रास्तभाव दुकानदार संघटनेने बुधवार १० रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती यांना तहसीलदार वरुड यांच्यामार्फत निवेदन दिले. शासनाने तातडीने या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दुकानदारांनी दिला आहे. शासनाने एप्रिल, मे आणि जून २०२६ चे एकत्रित धान्य वाटप जाहीर केले होते. परंतु एफसीआयकडून उशिरा पुरवठा झाल्यामुळे वरुड-शेंदुरजनाघाटसह ग्रामीण भागातील दुकानांमध्ये एप्रिलचे धान्य वेळेवर पोहोचू शकले नाही. सद्यस्थितीत गोदाम व दुकानांत एप्रिलचा साठा उपलब्ध आहे. मात्र १ मे पासून पीओएस मशीनमधून एप्रिल महिन्याचा डेटाच हटवण्यात आला आहे. मशीनमध्ये पर्याय उपलब्ध नसल्याने दुकानदार धान्य देऊ शकत नाहीत. यामुळे संतप्त लाभार्थी रोज दुकानांत येत असून दुकानदार व लाभार्थी यांच्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एप्रिल २०२६ चा डेटा पीओएस मशीनमध्ये त्वरित रिस्टोर करून धान्य वाटपासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी. ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. रास्तभाव दुकानदारांना नोव्हेंबर २०२५ पासून आजतागायत एक रुपयाही कमिशन मिळालेले नाही. तब्बल ६ महिने कमिशन रखडल्यामुळे दुकानदार हवालदिल झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रोजचा घरखर्च आणि दुकानाचा खर्च कसा भागवायचा, असा संतप्त सवाल दुकानदार करत आहेत. मार्च २०२६ पर्यंतचे सर्व थकीत कमिशन दुकानदारांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावे. सोबतच वरुड-शेंदुरजनाघाट नगरपरिषद क्षेत्रात थेट ट्रकद्वारे धान्य वाटप केले जाते. वाहतुकीदरम्यानच्या या पद्धतीमुळे धान्य वेळेवर मिळत नाही. परिणामी वाटपाची सरासरी बिघडते. अनेक गरीब लाभार्थी धान्यापासून वंचित राहतात. ही पद्धत बंद करून शासकीय धान्य गोदाम, वरुड येथूनच प्रत्येक दुकानाला धान्य मोजून देण्यात यावे. त्यामुळे पारदर्शकता राहील. अशा प्रकारच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष बाबारावजी भोंड, उपाध्यक्ष देवेंद्र बोडखे, सचिव रमेश जैन, भूषण महात्मे, लतिक पटेल, राम खंडेलवाल, गुड्डू खंडेलवाल, नरेश काळे, कैलास वाडोदे, संतोष पवणे, श्याम दारोकर, राजू शहाणे, पिंटू बहुरूपी, नरेंद्र खंडेलवाल, दिलीप इंगळे, सुधाकर गुडधे, धर्मेंद्र कोल्हे, छायाताई मेश्राम, प्रकाश शिंगारवाडे, सुरेश भागवत, रवी तिडके यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका रास्तभाव संघटनेचा आंदोलनाचा इशारा “शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि तांत्रिक त्रुटींमुळे जनतेचा रोष आम्हाला सहन करावा लागत आहे. तांत्रिक चूक शासनाची आहे. लाभार्थी आम्हाला जबाबदार धरून बोल लावत आहेत. यामुळे दुकानदारांची नाहक बदनामी होत आहे. प्रशासनाने या ३ मागण्यांची तातडीने दखल घ्यावी. अन्यथा आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही. – तालुका रास्तभाव दुकानदार संघटना, वरुड.
Source link
एप्रिलचे धान्य गोदामात पडून; पॉस मशीनमधून डेटा गायब!:वरुडच्या रास्तभाव दुकानदारांचे शासनाला ‘अल्टिमेटम’