Headlines

नागपूर कौशल्य विकास विद्यापीठाच्या जागेचा निर्णय महिनाभरात:हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री फडणवीस




नागपूर जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय पुढील एका महिन्यात घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भातील वाढत्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी पारडी परिसरात ‘नागपूर स्किल सेंटर’ उभारण्यात आले आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID), टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र साकारले आहे. या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, २०१४ पूर्वी शिक्षणातून मिळणारे कौशल्य आणि त्याचा रोजगारासाठी होणारा प्रत्यक्ष वापर यावर गांभीर्याने विचार झाला नव्हता. २०१४ नंतरच कौशल्य विकासाला धोरणात्मक महत्त्व देण्यात आले. आज एका बाजूला युवकांसमोर रोजगाराची समस्या आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळत नाही. ही दरी सांधण्यासाठीच अशा कौशल्य विकास केंद्रांची संकल्पना पुढे आली आहे. विदर्भामध्ये सोलर, इलेक्ट्रिक वाहने, आरोग्य आणि लोहखनिज क्षेत्रांत मोठी ‘इकोसिस्टम’ तयार होत आहे, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. सध्या कौशल्य प्रशिक्षणातून ७५ टक्के युवकांना रोजगाराच्या संधी मिळत असून, हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे राज्य सरकारचे ध्येय आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, गडचिरोली आणि नागपूरसह संपूर्ण विदर्भात लोहखनिज व विविध क्षेत्रांतील उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक येत आहे. या कौशल्य विकास केंद्रामुळे व प्रस्तावित विद्यापीठामुळे स्थानिक युवकांना आपल्याच भागात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘एआयडी’कडून चंद्रपूर किंवा गडचिरोली जिल्ह्यात ‘एकात्मिक पोलाद उत्पादन प्रकल्प’ उभारण्यासाठीचे स्वारस्यपत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच, ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’ आणि ‘नॅशनल अकॅडमी फॉर डिफेन्स प्रॉडक्शन’ यांच्यात महत्त्वपूर्ण कराराची देवाणघेवाण झाली. नागपूर स्किल सेंटरची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या केंद्रात दरवर्षी सुमारे २,००० युवकांना प्रशिक्षित करण्याची क्षमता आहे. येथे १० वी, १२ वी व पदवीधर युवक-युवतींसाठी निःशुल्क अल्पकालीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. रोजगाराभिमुख कौशल्यांसोबतच इंग्रजी संभाषण, संगणक ज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास आणि प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन केले जाते. अनेक अभ्यासक्रमांमध्ये ‘ऑन-द-जॉब’ प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *