![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) भोंगळ कारभारावरून सरकारवर जोरदार टीका केली. एक्साइज विभागासह विविध परीक्षांमधील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरले. पवार म्हणाले की, आरटीओ आयुक्त असताना गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याकडे एमपीएससीचे अध्यक्षपद दिले आहे. एक्साइज विभागाच्या पदोन्नती परीक्षेत मार्किंग पॅटर्न आणि प्रश्नपत्रिका फोडून पैशांच्या बदल्यात बदल्या व पदोन्नती देण्यात आल्या. या गैरप्रकाराची जबाबदारी स्वीकारून अध्यक्षांनी तातडीने राजीनामा द्यावा. अन्यथा तुकाराम मुंढे किंवा महेश झगडे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची तिथे नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागण्यांवर तीन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास १२ सप्टेंबरला लातूर आणि त्यानंतर पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रात यंदा पावसाने ओढ दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विदर्भात सरासरीपेक्षा ४० टक्के, तर मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात ४० ते ४५ टक्के पाऊस कमी झाला आहे. २० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस कमी असलेल्या तालुक्यांमध्ये तातडीने दुष्काळ जाहीर करून चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली. पवार यांनी सांगितले की, ५५ पैकी केवळ १० लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, तर ४० लाख शेतकरी नव्या कर्जापासून वंचित आहेत. धानाला प्रती क्विंटल ३ हजार ५०० रुपये भाव देऊन बोनस जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. या मागण्यांसाठी भंडारा येथून आंदोलनाची सुरुवात करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेऊन घटनादुरुस्ती करावी, असेही ते म्हणाले. यामुळेच न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळू शकेल. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने गांभीर्याने तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना केल्या. तसेच, पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी ‘बुक माय शो’वरून नोंदणी करून भाजप नागरिकांचा डेटा गोळा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Source link
एमपीएससी पेपरफुटीवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल:राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरही सरकारवर टीकास्त्र