![]()
अहिल्यानगर एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणी आणि चारा टंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आगामी काळात पर्जन्यमानावर होणारा परिणाम लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना ‘वॉटर-फेडर’ नियोजनाचे निर्देश दिले आहेत. “टंचाईची परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा, असे डॉ. आशिया यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या महत्त्वपूर्ण बैठकीला उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी अनुपकुमार यादव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी अभिजित हराळे, नायब तहसीलदार भारती घोरपडे उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख व्हीसीद्वारे (दूरदृश्य प्रणाली) बैठकीत सहभागी झाले होते. पशुधनासाठी चारा टंचाई भासू नये, यासाठी गाव, मंडळ आणि तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ज्या भागात चाऱ्याची उपलब्धता अधिक आहे, तिथून टंचाई असलेल्या तालुक्यांमध्ये चारा पुरवठा करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच करण्याचे आदेश सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. पाण्याच्या गुणवत्तेशी तडजोड नको “पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाकडून कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक तालुक्यात नियमितपणे पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रात पाणी वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता राखून नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा,” असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. अनधिकृत पाणी उपशावर ‘वॉटर स्क्वॉड’चा चाप जिल्ह्यातील पाणीस्रोतांमधून होणाऱ्या अवैध पाणी उपशाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणांवर शीघ्रगतीने कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष ‘वॉटर स्क्वॉड’ (पथक) स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
Source link
एल-निनोचे संकट: पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा:जिल्हाधिकारी डॉ. आशियांचे निर्देश, अनधिकृत पाणी उपशावर होणार कारवाई