Headlines

पाथर्डीत वादळी वारा अन् गारपिटीचा तडाखा:पत्रे उडाली, गावांत वीज गुल, अवकाळी संकटामुळे नागरिकांची उडाली तारांबळ,मदतीची मागणी‎




पाथर्डी तालुक्यासह शहरात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीटयुक्त पावसाने जोरदार हजेरी लावली. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या अवकाळी संकटामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून शहरात काही ठिकाणी फ्लेक्स बोर्ड कोसळले. तसेच अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला. सोमवारी संध्याकाळनंतर अचानक हवामान बदलले आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागांत गारपीटही झाली. या वादळी वाऱ्याचा मोठा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, झाडांवरील कैऱ्यांचा खच जमिनीवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. मोहरी येथील नवनाथ वाल्हेकर यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. दरम्यान, उन्हाच्या तीव्र झळांनंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. डोंगराळ भागाच्या पायथ्याशी असलेल्या लहान-मोठ्या बंधाऱ्यांमध्ये आणि नाल्यांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून सध्या नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील मोहरी येथील नवनाथ वाल्हेकर यांच्या घराचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाले व संसार उघड्यावर पडला. छाया: राजेंद्र भंडारी सोमवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार उडवला. घरावरील पत्रे उडाली आहेत. घराचीदेखील पडझडही झाली आहे. ऐन पावसाळ्यापूर्वी घर उघड्यावर पडल्याने आमचे प्रचंड हाल होत आहेत. पत्रे उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून कुटुंबांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन मदत करावी, जेणे करून आमचे घर पुन्हा उभा राहील, असे माहेरी येथील शेतकरी नवनाथ वाल्हेकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. तालुक्याला वर्षभरात पावसाचा मोठा फटका मागील वर्षभरात पाथर्डी तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. गतवर्षी मे महिन्यात तर तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त अनेक शेतकऱ्यांना तर अद्यापपर्यंतही मदत मिळालेली नाही. आता मान्सूनपूर्व पावसातच हाहाकार उडाला असून प्रत्यक्ष मान्सून सुरू झाल्यावर आणखी गंभीर स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *