![]()
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेवरील फुलझरी गावात महावितरण कर्मचाऱ्यांनी वाघापासून आपला जीव वाचवण्यासाठी थेट विजेच्या खांबावर चढून एक तास घालवल्याची थरारक घटना समोर आली आहे. या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. महावितरणचे कर्मचारी नेहमीप्रमाणे फुलझरी गावात विजेच्या वाहिन्यांची दुरुस्ती करत होते. काम सुरू असतानाच अचानक झुडपातून एका वाघाने शांतपणे प्रवेश केला. वाघ समोर आल्याचे पाहताच कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पळून जाणे शक्य नसल्याने, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट विजेच्या खांबावर चढण्याचा निर्णय घेतला. जवळपास एक तासभर वाघ खांबाच्या आसपासच फिरत होता, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. खाली वाघ गुरगुरत असताना, वर कर्मचारी धडधडत्या छातीने खांबाला पकडून बसले होते. अखेर, तासाभरानंतर वाघ शांतपणे जंगलाच्या दिशेने निघून गेला. वाघ नजरेआड झाल्यावर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि खांबावरून खाली उतरून आपले राहिलेले वीजदुरुस्तीचे काम पूर्ण केले. चंद्रपूर आणि ताडोबाच्या लगतच्या भागात वाघांचा वावर आता नित्याचाच झाला आहे. या घटनेमुळे महावितरण, वनविभाग आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Source link
वाघापासून वाचण्यासाठी महावितरण कर्मचारी विजेच्या खांबावर:ताडोबा सीमेवरील फुलझरी गावात घडला थरारक प्रसंग