![]()
दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘नीट’ पेपरफुटीविरोधात ऐतिहासिक आंदोलन उभे करून थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या अभिजित दिपके यांच्या कुटुंबीयांची मंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेतली. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अध्यक्ष असलेल्या अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन शिरसाट यांनी त्यांच्या आई-वडिलांशी प्रदीर्घ चर्चा केली. या भेटीदरम्यान त्यांनी अभिजितचे कौतुक करत त्याला पोलिस संरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखालील ‘जेन झी’ तरुणांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पायउतार व्हावे लागले. या यशानंतर मंत्री शिरसाट यांनी थेट दिपके यांचे घर गाठले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मला अभिजितच्या कुटुंबीयांना भेटायला यापूर्वीच यायचे होते. मात्र, माझ्या आधी येण्यामुळे या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटले असते आणि आंदोलनाला वेगळा रंग लागला असता, त्यामुळे मी ती भेट टाळली. आता अभिजितला एवढे मोठे यश मिळाले आहे आणि तो माझ्या मतदारसंघातील तरुण आहे. आपल्या मतदारसंघातील एखाद्या तरुणाने एवढे मोठे यश मिळवल्यावर त्याच्या पाठीशी उभे राहणे, हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. अभिजित दिपकेंना मिळणार पोलिस संरक्षण संजय शिरसाट म्हणाले की, येत्या 2-3 दिवसांमध्ये अभिजित महाराष्ट्रात, आपल्या घरी परतेल. त्याने अत्यंत मोठा लढा उभारला आहे. त्यामुळे तो जेव्हा महाराष्ट्रात येईल, तेव्हा त्याच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे त्याला विशेष पोलिस संरक्षण देण्याची मागणी करणार आहे. राजकीय पक्षांनी स्वतःची पोळी भाजून घेतली संजय शिरसाट म्हणाले की, अभिजित दिपके याने उभारलेल्या या लढ्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच या आंदोलनाला यश मिळाले. अभिजितच्या या यशस्वी आंदोलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम केले. भेटीचे राजकीय महत्त्व गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात जे काम बलाढ्य विरोधी पक्षांना जमले नाही, ते काम एका तरुण विद्यार्थ्याने आणि त्याच्या ‘जेन झी’ सहकाऱ्यांनी करून दाखवले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्यासारख्या वजनदार मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे देशभरात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट यांनी अभिजित दिपके यांच्या कुटुंबाची घेतलेली ही सदिच्छा भेट राजकीय वर्तुळात विशेष लक्षवेधी आणि महत्त्वाची मानली जात आहे.
Source link
मंत्री संजय शिरसाट थेट दिपकेंच्या घरी:म्हणाले- अभिजितच्या आंदोलनावर अनेक पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजली