![]()
पुण्यात जमीन विक्रीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम विलास चाकणकर (रा. गारमळा, धायरी) आणि अक्षय रमेश मोरे (रा. न्यू कोपरे, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नांदेड सिटी पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी व्यावसायिक प्रवीण प्रतापराव जगताप (वय 55, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. प्रवीण जगताप यांची कासुर्डी (ता. भोर) येथे जमीन आहे. मार्च 2023 मध्ये चाकणकरसोबत या जमिनीचा आठ कोटी रुपयांत विक्रीचा व्यवहार ठरला होता. त्यानुसार चाकणकरने एक कोटी 85 लाख रुपये, तर त्याचा मित्र सचिन सुर्वे याच्यामार्फत 50 लाख रुपये, असे एकूण दोन कोटी 35 लाख रुपये जगताप यांना दिले होते. मात्र, 2025 मध्ये आपसात वाद झाल्याने हा व्यवहार रद्द करण्यात आला. त्यानंतर जगताप यांनी दोन कोटी 35 लाख रुपये डीडीद्वारे परत केले. तसेच व्यवहार रद्द झाल्याची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली. दरम्यान, डिसेंबर 2025 मध्ये अक्षय मोरे याने दिवाणी न्यायालयात दावा केला. चाकणकरने हीच जमीन जुलै 2022 मध्ये 20 लाख रुपयांना आपल्याला विकल्याचा दावा मोरेने केला आहे. मात्र, जगताप आणि चाकणकर यांची पहिली भेटच 10 मार्च 2023 रोजी झाली होती. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजेच 16 जुलै 2022 रोजी जमीन विक्री झाल्याचे दर्शवणारी कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आला. याच आधारावर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विक्रम चाकणकर याचे नाव कात्रज आणि नवले पुलाजवळ घडलेल्या एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणातही समोर आले होते. 18 जुलै 2026 रोजी व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्या वाहनातील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात चाकणकरसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण लागले. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खेड-शिवापूर पोलिस चौकीतील महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजीजजब्बार मेस्त्री यांचा दरोड्याच्या प्रकरणातील आरोपींना मदत आणि संरक्षण दिल्याचा आरोप तपासात समोर आला. नांदेड सिटी पोलिसांनी चाकणकर आणि मोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रसाद राऊत पुढील तपास करत आहेत.
Source link
पुण्यात जमिनीच्या व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक:बनावट कागदपत्रांप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल