![]()
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केले आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रसंगी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये कोविड काळात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या एस.टी. कर्मचारी व पर्यवेक्षकांना शासन नियमांनुसार विशेष कोविड प्रोत्साहन भत्ता, हजेरी प्रोत्साहन भत्ता, शिलाई भत्ता आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती त्वरित करण्याची मागणी आहे. यासोबतच, कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना एस.टी. कामगारांपर्यंत पोहोचविण्याची मागणीही करण्यात आली आहे. एस.टी.चे चालक, वाहक, सहायक, शिपाई आदी कर्मचाऱ्यांची लिपिक-टंकलेखक पदोन्नती प्रक्रिया रखडली आहे, ज्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सदर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. आगामी दहा दिवसांत रा.प. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवले नाहीत, तर कामगार सेनेच्या वतीने उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी कामगार सेनेचे अमरावती प्रादेशिक सचिव मोहन टेकाडे, ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी विभागीय सचिव बाळासाहेब राणे, विभागीय सचिव दिनेश शेळके, अमरावती आगाराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खोंड, आगार सचिव शिवा भारती, दर्यापूर आगाराचे महेंद्र चतारे, ज्ञानेश्वर आपोतीकर, अमोल सगने, बडनेरा आगाराचे अमोल अक्कलवार आणि कामगार सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Source link
एस.टी. कामगार सेनेचा उपोषणाचा इशारा:प्रलंबित मागण्यांसाठी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर