![]()
पुण्यात ऑनलाईन औषध विक्रीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बेकायदेशीर ऑनलाईन विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला होता. संघटनेचे पुणे अध्यक्ष संदीप पारख यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे 12.50 लाख औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. या आंदोलनाचा भाग म्हणून बुधवारी संघटनेच्या वतीने पॉवर हाऊस रास्ता पेठ येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संघटनेचे पुणे सेक्रेटरी अनिल बेलकर, खजिनदार रोहित करपे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि औषध विक्रेते सहभागी झाले होते. संदीप पारख यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, औषध व्यवसाय ‘ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940’ आणि ‘रूल 1945’ अंतर्गत नियंत्रित केला जातो. मात्र, ऑनलाईन औषध विक्रीसाठी अद्याप कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नसतानाही देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन विक्री सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीस स्थगिती दिली असतानाही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला. कोरोना महामारीच्या काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी सरकारने तात्पुरती सूट दिली होती. मात्र, महामारी संपल्यानंतरही ही सूट मागे घेण्यात आलेली नाही. याचा फायदा घेत ऑनलाईन कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलती देऊन बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे लहान औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ‘ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर 2013’ नुसार औषध विक्रेत्यांसाठी निश्चित नफा मर्यादा आहे. परंतु, कॉर्पोरेट कंपन्या 20 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत देत असल्याने पारंपरिक औषध विक्रेते स्पर्धेत टिकू शकत नाहीत. डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांच्या पर्यायी ब्रँड देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना मिळावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे. संघटनेने यापूर्वी केंद्र सरकार, संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे अनेकदा निवेदने दिली होती, परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरातील शहरांमध्ये मेडिकल दुकाने बंद ठेवून औषध विक्रेत्यांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरकारने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
Source link
ऑनलाईन औषध विक्रीविरोधातील बंदला 100 टक्के प्रतिसाद:पुण्यात औषध विक्रेत्यांचा मोर्चा; बेकायदेशीर विक्री थांबवण्याची मागणी