Headlines

ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी:ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल




ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी असेल, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना हाके यांनी हे आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचे अज्ञान असल्याचे म्हटले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत, असे स्पष्ट केले. हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचे कवडीचेही ज्ञान नसलेल्या माणसाच्या हातात गेलेला पोरखेळ आहे. सरकारने त्यांच्यासाठी नेहमीच ‘रेड कार्पेट’ घातले असून, त्यांच्या दबावाखाली येऊन काढलेले सरकारी नोटिफिकेशन पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जरांगे पाटील यांच्या नवव्या उपोषणावर बोलताना हाके यांनी त्यांना उपरोधिक सदिच्छा दिल्या. ते म्हणाले, “याआधी 8 वेळा उपोषण झाले आहे, आता हे नववे उपोषण सुरू आहे. पाच पिढ्यांचे नुकसान झाल्याचा दावा जरांगे करत आहेत, पण मग यामुळे फायदा नेमका कुणाचा झाला? मुळात मराठा समाजातील गरिबीला ओबीसी आरक्षण कसे काय जबाबदार असू शकते?” त्यांनी जरांगे पाटलांना बजेटमध्ये ओबीसींसाठी किती निधी येतो, याचे आत्मपरीक्षण करण्यास सांगितले. पुढाऱ्यांनी आणि सहकार महर्षींनीच संपत्तीचे केंद्रीकरण करून मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाच्या धोरणांवर प्रहार करताना हाके म्हणाले की, सरकारने जरांगे यांचे अवाजवी लाड पुरवले आहेत. मुख्यमंत्री आणि मंत्री केवळ त्यांनाच भेटायला जातात, पण त्यांना ओबीसी समाजाचे दुःख आणि भूमिका का कळत नाही? सरकार कोणताही निकष न लावता बेकायदेशीरपणे प्रमाणपत्रे वाटत असून, सर्व कुणबी प्रमाणपत्रे बनावट असल्याचा दावा त्यांनी केला. या आंदोलनामुळे ओबीसींचे मोठे नुकसान झाले असून, आमचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले की, ते स्वतः आता उपोषणाला बसणार नसून थेट मैदानात उतरून लढा देणार आहेत. त्यासाठी राज्यभर जनजागृती सभांचा धडाका सुरूच राहील. जरांगे हे नक्कीच लढणारे गडी आहेत, पण त्यांची मागणी पूर्णपणे चुकीची आहे. त्यांचे ज्ञान कमी आहे, पण सध्या त्यांची तब्येत खूप बिघडली आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण करू नये, असे आवाहन हाके यांनी केले. “जरांगे दादा, तुम्ही गरजवंतांचा लढा उभा केलात, पण त्याचा फायदा नेमका कोणी घेतला याचा विचार करा. तुमचे मन मोठे करा आणि सर्व समाजाच्या प्रश्नांवर एकत्र या, आम्ही तुमच्यासोबत उभे राहायला तयार आहोत,” असे आवाहनही शेवटी हाके यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *