![]()
नागपूरमध्ये डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे ‘एक पेड नाती के नाम’ या वृक्षारोपण आणि संवर्धन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, जिथे पर्यावरणप्रेमी नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षांचे वाटप करण्यात आले. नागपूर आणि विदर्भातील वाढत्या तापमानाचा विचार करून, केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे जतन करण्यावर फाउंडेशनने भर दिला आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे लावली जातील आणि त्यांचे संवर्धन केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने ‘एक पेड नाती के नाम’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. या अभियानांतर्गत नागपूर शहरातील किमान 10 उद्यानांमध्ये भारतीय वंशाच्या वृक्षांचे रोपण केले जाईल. या वृक्षांच्या जतनासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेतले जाईल. या दोन्ही उपक्रमांची प्रत्यक्ष सुरुवात पावसाळ्यात, चांगला पाऊस झाल्यानंतर केली जाईल, अशी माहिती डॉ. दंदे यांनी दिली. डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले की, या उपक्रमांतर्गत दुर्मिळ होत चाललेल्या भारतीय वृक्षांचे जतन आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी फाउंडेशन काम करत आहे. येत्या एक-दोन वर्षांत या कामाची सकारात्मक फलश्रुती दिसून येईल. नागपूरच्या तापमानाचा विचार करता, केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर ती जगवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या नातवंडांच्या भविष्यासाठी या उपक्रमात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात गडकरी यांना ‘कृष्णवड’ हा एक दुर्मिळ वृक्ष भेट म्हणून देण्यात आला आणि त्याचे रोपणही करण्यात आले. हा वृक्ष मराठीत ‘कृष्णवड’, हिंदीत ‘माखन कटोरी’ आणि इंग्रजीत ‘कृष्णा बटरकप ट्री’ म्हणून ओळखला जातो. मोरेसी कुळातील हे एक पवित्र झाड आहे. या झाडाची पाने तळाशी गोलाकार दुमडून नैसर्गिक कपाचा किंवा द्रोणाचा आकार घेतात. हा सदाहरित आणि वेगाने वाढणारा मोठा वृक्ष असून, याला वडाच्या झाडासारख्या पारंब्या फुटतात. वैज्ञानिकदृष्ट्या हे झाड भारताच्या राष्ट्रीय वृक्षाशी (वडाशी) जवळून संबंधित आहे. या झाडाच्या नावामागे एक प्रसिद्ध कथा आहे, ज्यात बाळकृष्णाने लोणी चोरताना या झाडाच्या पानात लपवले होते असे म्हटले जाते.
Source link
नागपुरात डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे 'एक पेड नाती के नाम' उपक्रम:10 उद्यानांमध्ये भारतीय वंशाच्या वृक्षांचे रोपण करणार, नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ