Headlines

औंढा नागनाथजवळ भीषण अपघात:खांडेश्‍वरी मंदिराजवळ भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एक जखमी




औंढा नागनाथ शिवारात खांडेश्‍वर देवीच्या मंदिरा जवळ भरधाव पिकअपची दुचाकीस धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. १५ दुपारी घडली आहे. गंभीर जखमींवर औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील नवनाथ कऱ्हाळे हे पिकअप वाहनामध्ये (क्र.एमएच-२६-एच-९५४६) हळदीचा कोचा भरून आज दुपारच्या सुमारास शिरडशहापूरकडे निघाले होते. भरधाव वेगाने जात असलेले पिकअप औंढा नागनाथ पासून काही अंतरावर असलेल्या खांडेश्‍वरी देवीच्या मंदिरासमोर आले असतांना समोरून वगरवाडी येथून दुचाकीला पिकअप वाहनाची धडक बसली. या अपघातात दुचाकी वाहनाचा चुराडा झाला तर पिकअप वाहन देखील रस्त्याच्या खाली गेले. या अपघातात दुचाकी वरील गजानन मंचकराव कदम (२३), सुरज बाळासाहेब उबाळे (२६) दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे औंढा नागनाथ ते जिंतूर व औंढा नागनाथ ते वसमत मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, महामार्ग पथकाचे उपनिरीक्षक खयामुद्दीन खतीब, उपनिरीक्षक टाकरस, जमादार राजाराम कदम, प्रमोद थोरात, अमोल इंगळे, वसीम पठाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जखमींची तपासणी केल्यानंतर गजानन व सुरज या दोघांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. तर गंभीर जखमी झालेल्या पिकअप चालक नवनाथ यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे वगरवाडी गावावर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *