![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते आणि वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार संदिपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्याची मागणी केली. या भेटीदरम्यान, खासदार संदिपान भुमरे यांनी कन्नड तालुक्यातील औट्रम घाटाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची आग्रही मागणी केली. अनेक वर्षांपासून या घाट परिसरातील वाहतुकीची समस्या कायम आहे. हे काम पूर्ण झाल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल आणि वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होईल, असे भुमरे यांनी नमूद केले. यासोबतच, छत्रपती संभाजीनगर-पैठण मार्गावरील चित्तेगाव, बिडकीन आणि ढोरकीन या गावांना स्वतंत्र बायपास रस्त्यांना मंजुरी देण्याची महत्त्वपूर्ण मागणीही खासदार भुमरे यांनी केली. छत्रपती संभाजीनगर-पैठण हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. या मार्गावर अनेक औद्योगिक क्षेत्रे असून, दररोज हजारो कामगार, व्यावसायिक आणि मालवाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. श्री क्षेत्र पैठण हे महत्त्वाचे धार्मिक व पर्यटनस्थळ असल्याने वर्षभर मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटकही या मार्गाचा वापर करतात. चित्तेगाव, बिडकीन आणि ढोरकीन या प्रमुख गावांतून महामार्गावरील वाहतूक जात असल्याने स्थानिक वाहतूक, पादचाऱ्यांची वर्दळ आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यामुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक आणि पैठणकडे जाणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढतो आणि अपघाताचा धोकाही वाढतो, असे भुमरे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणले. औद्योगिक वाहतूक आणि भविष्यातील वाढता विकास लक्षात घेता या गावांना बायपास देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे बायपासच्या कामांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार भुमरे यांनी केली. बायपासमुळे अवजड व लांब पल्ल्याची वाहतूक गावाबाहेरून वळवता येईल, असेही ते म्हणाले.
Source link
औट्रम घाटाचे काम, बायपासला मंजुरी द्या:खासदार संदिपान भुमरेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी