![]()
बुरुडगाव कचरा डेपो येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या ५०० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला वादळी वाऱ्याचा आणि मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसला आहे. सुमारे दोन ते सव्वादोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात होते. सध्या ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प कार्यान्वित होणार होता. मात्र, वीज निर्मिती सुरू होण्याआधीच आलेल्या वादळामुळे प्रकल्पाचे साधारण २५ ते ३० टक्के नुकसान झाले आहे. या घटनेनंतर महापौर ज्योती गाडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख पी. एस. बिडकर व अभियंता गणेश गाडळकर यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. आपत्तीच्या काळात असे प्रकल्प सुरक्षित राहावेत यासाठी कचरा डेपो परिसरात दोन मजबूत शेड उभारून त्यावर सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच, नुकसानग्रस्त भागाची तातडीने दुरुस्ती करून ट्रान्सफॉर्मरचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले. महापौरांनी खत निर्मिती, बायोमेडिकल वेस्ट, लिचेट प्रक्रिया आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावणारे प्रकल्प यांसारख्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित इतर सुविधांचाही आढावा घेतला. ५०० किलोवॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प उभारताना ”विंड लोड कॅपॅसिटी” (वाऱ्याचा दाब सहन करण्याची क्षमता) हा सर्वात महत्त्वाचा तांत्रिक निकष असतो. अहिल्यानगरसारखा भाग ”विंड झोन ३” किंवा ”विंड झोन ४” मध्ये येतो. या झोननुसार सोलर पॅनल्स आणि त्यांचे लोखंडी स्ट्रक्चर ४४ मीटर/सेकंद (सुमारे १५८ किमी/तास) ते ४७ मीटर/सेकंद (सुमारे १६९ किमी/तास) वेगाचे वारे सहज सहन करू शकेल असे डिझाइन केलेले असावे. मोकळे मैदान किंवा डेपोमध्ये वाऱ्याला कोणताही अडथळा नसतो आणि वाऱ्याचा थेट मारा पॅनल्सवर होतो. अशा ठिकाणी स्ट्रक्चर अधिक मजबूत असावे लागते. तसेच, प्रकल्पाच्या भोवती झाडांची तटबंदी, संरक्षक भिंत यासारखे विंड ब्रेकर बसणे आवश्यक असते.
Source link
कचरा डेपोतील सोलर प्रकल्पाची 25 टक्के पडझड:वादळी वाऱ्याचा फटका, दोन शेड उभारून प्रकल्प विकसित करण्याच्या महापौरांच्या सूचना