Headlines

कल्याणशेट्टी, देशमुख, शिंदेंमध्ये श्रेयाची स्पर्धा:गडकरींचे पत्र बापूंना, 81.37 किलोमीटर रस्त्यासाठी 740.37 कोटी रुपये निधीला चार दिवसांपूर्वी मंजुरी‎




सोलापूर मोहोळ- बसवनगर (तेरा मैल) – वळसंग या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ अंतर्गत असलेल्या ८१.३७ किलोमीटर मार्गाच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चार दिवसांपूर्वी ७४०.३८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. मात्र या एका कामाचे श्रेय घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तीन लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची स्पर्धा लागली आहे. भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्वात प्रथम गडकरींचे सोशल मीडियावर अभिनंदन केले. त्यांच्या समर्थकांनी ‘दादांमुळेच काम मार्गी’ अशी मोहिम चालवली. त्या पाठोपाठ भाजपचेच दक्षिण सोलापुरातील आमदार सुभाष देशमुख यांनीही सोशल मीडियावर गडकरींचे आभार मानून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. भाजपमधील दोन आमदारांमध्ये ही स्पर्धा सुरु असताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही त्यात उडी घेतली. या कामासाठी आपण गडकरींची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते, याचे फोटोसह पुरावेच जाहीर केले. १३ डिसेंबर २०२५ रोजी गडकरी यांना दिलेले पत्रही त्यांनी लोकांसमोर ठेवत ‘काम बोलते’ असे दावेही केले होते. खासदार शिंदेंमुळेच हे काम मार्गी लागले, असे दावे त्यांच्याही समर्थकांनी केले होते. या तीनही लोकप्रतिनधींमध्ये कामाचे श्रेय घेण्याची ही स्पर्धा सुरु असताना ज्यांनी या कामाला मंजुरी दिली ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र या श्रेयाचे माप त्यांचे जुने सहकारी आमदार सुभाष देशमुखांच्या पदरात टाकले. गडकरी यांनी याबाबत देशमुख यांना एक पत्र पाठवून २०१५ पासून आपण पाठपुरावा करत असलेल्या या कामाला अखेर आमच्या मंत्रालयाने मंजुरी दिली असून लवकरच हे काम मार्गी लागेल, असे त्यात नमूद केले आहे. खुद्द देशमुख यांनी हे पत्र सोशल मीडियात व्हायरल करत ‘हे आपलचे श्रेय’ असल्याचे ठासून सांगितले. संग्रहित चित्र आमदार सुभाष देशमुख यांना ४ मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठवलेले पत्र. मोहोळ, कुरुल, कामती, तेरामैल, बसवनगर, औराद, बंकलगी, वळसंग या मार्गाचा विकास होणार आहे. या या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण तसेच आवश्यक त्या ठिकाणी पूल व इतर सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे सोलापूर परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. तसेच, ग्रामीण आणि शहरी भागांमधील दळणवळण सुलभ होऊन संपर्क यंत्रणा अधिक भक्कम होईल. सोलापूर शहरालाही अजून एक बाह्यवळण रस्ता उपलब्ध होणार आहे. व्यापार, उद्योग आणि विशेषतः शेतीलाही मोठा फायदा होईल. तो महामार्ग लवकरच सुरू होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *