![]()
कळमनुरी शहरात जून्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचा डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी ता. 24 पहाटे सहा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने चौघांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी ये्तील पाटील गल्ली भागातील रहिवासी असलेला नवनाथ शिवाजी बेद्रे (23) याचा काही मित्रांसोबत वाद झाला होता. यावादातून एकमेकांविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या होत्या. त्यानंतरही त्यांच्यात कुरबुरी होतच होत्या. दरम्यान, शनिवारी ता. 23 सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नवनाथ याच्या मित्राने त्याला बोलावून नेले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह साईनगर भागातील एका ठिकाणी असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष इंगळे, जमादार रवी इंगोले, गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मयत नवनाथ याच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे दिसून आले. या प्रकरणी शिवाजी बेद्रे यांनी आज पहाटे कळमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अमर शिंदे, परमेश्वर उर्फ बंटी जाधव, भारत यादव, दुर्गेश गाभणे, आकाश सातव, सुरेश सातव (रा. कळमनुरी) यांच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, उपाधीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली होती. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने अमर शिंदे, परमेश्वर उर्फ बंटी जाधव, दुर्गेश गाभणे, सुरेश सातव यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरु केली असून या खूनामध्ये आणकी काही कारण आहे काय याची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. या शिवाय उर्वरीत दोन आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके बाहेर जिल्ह्यात पाठविण्यात आली आहे. या घटनेमुळे कळमनुरी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Source link
कळमनुरीत जून्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा खून:सहा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, चौघांना अटक