![]()
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना दीप्ती चौधरी यांनी क्रांती दिनाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनात इंग्रजांनी भारत सोडावा असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ‘चले जाव’ चा नारा दिला. त्याच रात्री इंग्रज सरकारने काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींनी मुंबईच्या गवालिया टँक मैदानात तिरंगा झेंडा फडकवला. या आंदोलनात अनेक महिला आणि लाखो सत्याग्रहींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. यावेळी पोलिसांनी सत्याग्रहींवर लाठीचार्ज केला, अश्रू वायू सोडले आणि गोळीबारही केला. यात अनेक सत्याग्रही जखमी झाले आणि शहीद झाले. पुण्यामध्ये १६ वर्षीय नारायण दाभाडे हे काँग्रेस भवनमध्ये तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी येत असताना ब्रिटिश गोळीबारात शहीद झाले होते. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनामुळेच भारताच्या स्वातंत्र्याला एक निर्णायक कलाटणी मिळाली. या आंदोलनात शहीद झालेल्यांना अभिवादन करण्यासाठी ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून पाळला जातो. दीप्ती चौधरी यांनी युवकांना या शहीदांकडून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांच्यासोबत नगरसेवक रफिक शेख, माजी नगरसेविका लता राजगुरू, अजित दरेकर, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, सचिन आडेकर, सेवादलाचे रविंद्र म्हसकर, लतेंद्र भिंगारे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, राजाभाऊ कदम, सोशल मीडियाचे गुलाम हुसेन खान, बाळासाहेब अमराळे, निलेश बोराटे, द. स. पोळेकर आदींसह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
काँग्रेस भवनमध्ये ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण:दीप्ती चौधरी म्हणाल्या, युवकांनी स्वातंत्र्यसैनिकांकडून प्रेरणा घेऊन देशाची प्रगती करावी