Headlines

पुण्यात अश्वारूढ तिरंगा यात्रा, क्रांतिकारकांना अभिवादन:क्रांतिदिनी दिग्विजय प्रतिष्ठानतर्फे प्रथमच आयोजन




पुण्यात क्रांतिदिनानिमित्त अश्वारूढ तिरंगा यात्रा संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीतर्फे आयोजित या संचलनातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीला अश्वारोहकांनी अभिवादन केले. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून या अश्वारूढ संचलनाला प्रारंभ झाला. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी अश्वावर स्वार होऊन हाती तिरंगा ध्वज घेत यात्रेत सहभाग घेतला. अकॅडमीचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे, विनायक हळबे, नरेंद्र पाटील, जनक टेकाळे, समीर धर्माधिकारी यांच्यासह अनेक पुणेकर उपस्थित होते. वैभव कवडे, शशिकांत थोरात, साइदीप ढोबळेपाटील आणि आशिष जाधव यांनी या आयोजनात सहकार्य केले. ही यात्रा बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, टिळक चौक आणि लकडी पूल मार्गे छत्रपती संभाजी महाराज स्मारकापर्यंत पोहोचली. स्मारकाजवळ विश्रामबाग विभाग पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर या यात्रेचा समारोप झाला. आठ वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंतचे १५ प्रशिक्षित घोडेस्वार या अश्व संचलनात सहभागी झाले होते. गुणेश पुरंदरे यांनी सांगितले की, क्रांतिदिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही अनोखी अश्वारूढ तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अश्वारोहण करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पुणेकर नागरिकही हाती तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात आले. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमी मागील पंचवीस वर्षांपासून अश्वारोहण प्रशिक्षण, अश्वारोहण मोहिमा आणि स्पर्धांच्या माध्यमातून हा पारंपरिक व आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा प्रकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. नुकतीच मे महिन्यात त्यांनी २५ किल्ल्यांवरून ‘शिवचरित्र प्रसार’ ही अश्व मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली होती, ज्याला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *