Headlines

दूध, खाद्यतेलांप्रमाणे मद्यात भेसळ खपवून घेणार नाही:पेयजलांच्या गुणवत्तेवरही आता बारकाईने लक्ष – तुकाराम मुंढे



खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमध्ये भेसळीच्या तक्रारी वाढल्या असून, गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पुण्यात घडल्या आहेत. पेयजलांची गुणवत्ता, त्याचे उत्पादन आणि लेबलिंग यावर आमचे बारकाईने लक्ष आहे

.

प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने, सद्विवेक आणि अंतरात्म्याला फॉलो केले पाहिजे. केवळ प्रवाहासमवेत न वाहता समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, अशा प्रेरक शब्दांत त्यांनी “जेन झी’ पिढीला “बी युवरसेल्फ’चा मंत्र दिला.

पुणे लोकल आणि माय जनसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित “भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत “अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांनी मुंढे यांची मुलाखत घेतली. तुकाराम मुंढे यांचे वरिष्ठ बंधू अशोक मुंढे, विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष सुनील गाडवे, वी फाउंडेशनच्या शामला देसाई, आम्रपाली चव्हाण, दिनेश कदम आदी उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी आपल्या बालपणापासूनचा खडतर प्रवास, यूपीएससीतील अपयश आणि यश, प्रशासकीय कारकीर्दीतील कठोर निर्णय आणि अन्न सुरक्षेशी संबंधित धोरणांवर मनमोकळे भाष्य केले.

खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. चरबीयुक्त, खारट आणि साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणासारखे आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच कायद्याने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणेच खाद्यपदार्थ असले पाहिजेत. भेसळयुक्त अन्न, विषारी ताडी-दारू आणि निकृष्ट अन्नपदार्थ नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.

शाळेतच पहिला ‘बदली’चा अर्ज

तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या प्रतिमेशी जोडलेला एक रंजक किस्साही यावेळी समोर आला. ताडसुर्णा गावातील शाळेत आठवीत असताना भूगोलाचा एकही धडा शिकविला जात नसल्याची तक्रार आम्ही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. ‘आम्हाला या शिक्षकाची बदली पाहिजे,’ असा “आदेश’ असे लिहिलेला अर्ज आपण केला होता आणि त्यानंतर त्या शिक्षकाची बदलीही झाली,’ अशी आठवण त्यांनी सांगितली. या वेळी त्यांनी इतर मुद्द्यांवरह सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.

रेल्वेत टॉयलेटजवळ बसून प्रवास

“यूपीएससी’च्या तयारीदरम्यान १९९६ मध्ये पहिल्यांदा दिल्लीला गेल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. दिल्लीतील जवाहर बुक डेपोमधून पुस्तके घेतल्यानंतर पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या वेळी वेटरने ‘बिअर आणू का?’ असे विचारताच मला संताप आला. मी तातडीने बॅग पॅक केली आणि रेल्वे स्थानक गाठले. तिकीट नसतानाही कर्नाटक एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून टॉयलेटजवळ बसत भुसावळपर्यंत प्रवास केला आणि तेथून बसने छत्रपती संभाजीनगर गाठले,’ असे त्यांनी सांगताच सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

छत्रपती संभाजीनगरला असताना ऑम्लेट- पाव हाच होता आहार

बीए झाल्यानंतर एमए राज्यशास्त्र प्रवेशासाठी मी पहिल्यांदाच एसटीने पुण्यात आलो होतो. शिवाजीनगर बसस्थानकावरून पुणे विद्यापीठात पायी गेलो. प्रवेश मिळत होता, परंतु वसतिगृह उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्या सायंकाळी मला निराश होऊन परत जावे लागले. मित्राच्या खोलीवर पॅरासाइट म्हणून राहताना ढेकणांमुळे रात्र-रात्र झोप यायची नाही. त्या काळात चायनीज गाड्यांवर मी आयुष्यात पहिल्यांदा चायनीज खाल्ले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एमए करताना परिस्थितीमुळे ऑम्लेट-पाव आणि फरसाण-केळी हेच स्टेपल डाएट (मुख्य आहार) होते. आता मी ते स्ट्रीटफूड खाल्ले तर माझा घसा बसेल.

बदल्यांचा त्रास होत नाही

वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मला त्रास होत नाही. उलट बदल हा प्रगतीचा अविभाज्य भाग असून, माझ्या जितक्या जास्त बदल्या होतील, तितके अधिक सकारात्मक बदल घडतील, अशी रोखठोक भूमिका तुकाराम मुंढे यांनी मांडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *