Headlines

कामाच्या जोरावरच निवडणुका जिंका, ठाकरे यांचा नगराध्यक्षा भिसेंना सल्ला:कुर्डुवाडीची सत्ता राखल्याबद्दल डिकोळेंसह कार्यकर्त्यांचे मातोश्रीवर कौतुक‎




कुर्डूवाडी नगर परिषदेवर पुन्हा एकदा भगवा फडकवल्यानंतर नगराध्यक्षा जयश्री भिसे आणि जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी कुर्डूवाडीत सत्ता राखल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत आगामी काळासाठी ‘कामाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा’ मोलाचा सल्ला दिला. केवळ विजयाचे अभिनंदन करून न थांबता, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माढा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. नुकसान भरपाई मिळाली का, याबाबत त्यांनी तालुकाप्रमुख मधुकर देशमुख व उपजिल्हाप्रमुख राजाभाऊ गायकवाड यांच्याकडून विचारणा केली. सामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. नगरपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे निवडून आलेले प्रतिनिधी मातोश्रीवर जाऊन आशीर्वाद घेण्याची जुनी प्रथा आहे. विविध निवडणुकांच्या व्यस्ततेमुळे ही भेट लांबणीवर पडली होती. अखेर रविवारी (१२ एप्रिल) दुपारी २ वाजता वेळ मिळाल्याने नगराध्यक्षा जयश्री भिसे, सर्व नगरसेवक, अपक्ष नगरसेवक शकील तांबोळी व इतर पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या सोहळ्याप्रसंगी गटनेते ऋषीपाल वाल्मिकी, नगरसेविका अंजली गावडे, शहर प्रमुख कुमार गव्हाणे, युवा सेना प्रमुख उपस्थित होते. पुढील ३ वर्षे जनतेच्या सेवेसाठी झोकून द्या मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, “विधानसभेला अजून तीन वर्षे आहेत, तोपर्यंत जोमाने काम करा. आपल्याकडे मतदारांची कामे करणे हाच एक पर्याय आहे. यापुढील काळात नेत्यांच्या जीवावर नाही, तर तुम्ही केलेल्या कामाच्या जोरावरच आपण निवडणुका जिंकू शकतो.” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *