![]()
नाशिक जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन यांनी पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत आगामी कुंभमेळा आणि विशेषतः त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या गर्दीच्या नियोजनावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विकासकामे, व्हीआयपी दर्शन आणि विरोधकांच्या आरोपांवर सडेतोड उत्तरे दिली. त्र्यंबकेश्वरमधील व्हीआयपी दर्शन बंद नुकत्याच आलेल्या सुट्ट्यांदरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती. यावर तोडगा म्हणून आता शनिवार आणि सोमवार या गर्दीच्या दिवशी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महाजन यांनी जाहीर केला. तसेच, पैसे घेऊन मागच्या दाराने दर्शन देण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असे करणारे ट्रस्टी किंवा अन्य कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात केले जाणार आहेत. कुंभमेळ्यासाठी आरोग्य आणि पायाभूत सुविधांची तयारी: आगामी कुंभमेळ्यासाठी १०० बेडचे रेडीमेड रुग्णालय तात्काळ ताब्यात घेण्यात येणार आहे. स्वामी समर्थ ट्रस्टच्या रुग्णालयाचीही मदत घेतली जाईल. आपत्कालीन परिस्थितीसाठी हेलिकॉप्टर आणि पुरेशा रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण आणि रिंगरोडची कामे अतिशय वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बेछूट आरोप करू नका, माहिती घेऊन बोला नाशिकच्या विकासकामांच्या निविदा गुजरातमधील ठेकेदारांना दिल्या जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना महाजन यांनी सडेतोड उत्तर दिले. “सगळ्या निविदा प्रक्रियांमध्ये 100 टक्के पारदर्शकता आहे. अनेक कामे 20 ते 42 टक्के कमी दराने गेली आहेत. त्यामुळे बेछूट आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी पुरावे आणि कागदपत्रे तपासावीत,” असे आव्हान त्यांनी दिले. शहरात हरित नाशिक आणि रस्ते विकासावर भर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी द्वारका येथील कामे वेगात सुरू आहेत. शहरातून जाणाऱ्या कालव्यावर ‘बॉक्स’ टाकून ४ पदरी रस्ता तयार केला जाणार असून, यासाठी ५०० कोटींची निविदा लवकरच निघेल. अपघातांना कारणीभूत ठरणारी धोकादायक झाडे काढावी लागतील, मात्र एका झाडामागे १०० नवी, मोठी झाडे लावून ती जगवण्याची हमी त्यांनी दिली. कुंभमेळ्याचे आमंत्रण पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना देणार येत्या ३० ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाची सुरुवात होत आहे. यासाठी आपण स्वतः दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रपतींना आमंत्रण देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवसेना पक्षचिन्हाचा निकाल शिंदेंच्याच बाजूने लागेल सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीबाबत विचारले असता, “न्यायालयाच्या निर्णयावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने लागेल,” असा ठाम विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. काँग्रेसचा वंदे मातरमबाबतचा निर्णय हा राष्ट्रद्रोह काँग्रेसने वंदे मातरमबाबत घेतलेल्या भूमिकेवर महाजन यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “स्वातंत्र्यदिनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी वंदे मातरमच्या वेळी केलेले वर्तन हा देशाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान आहे, हा प्रकार राष्ट्रद्रोहासारखाच आहे,” अशी टीका त्यांनी केली. हेही वाचा… चिन्ह आम्ही नाही, निवडणूक आयोगाने दिले:शंभूराज देसाईंची ठाकरे गटावर टीका, म्हणाले- धनुष्यबाण गोठवा म्हणणे म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवणे “धनुष्यबाण हे केवळ एक चिन्ह नसून ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. बाळासाहेबांनी या चिन्हाला देवाऱ्यात पुजले होते. आता ‘धनुष्यबाण आम्हाला मिळत नसेल तर तो गोठवून टाका’, ही मागणी करणे म्हणजेच बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखे आहे,” असा जोरदार घणाघात शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटावर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने (उबाठा) केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देण्यासाठी शंभूराज देसाई यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
कुंभमेळ्यासाठी प्रशासन ‘अलर्ट मोड’वर:नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन विरोधकांना म्हणाले- बेछूट आरोप करू नका, माहिती घेऊन बोला