![]()
पातूर तालुक्यातील बाभुळगाव येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या शिर्ला येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाच्या वतीने ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. येथे पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सहकार्याने जनावरांच्या लसीकरण अभियानाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. अध्यक्षस्थानी बाभुळगावच्या सरपंच मीरा पातसपोर उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुधनाचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपस्थित शेतकऱ्यांना जनावरांना होणाऱ्या लाळ खुरकत, घटसर्प, फऱ्या आदी गंभीर व संसर्गजन्य रोगांविषयी सविस्तर माहिती दिली. या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपायांवरही त्यांनी प्रकाश टाकला. तसेच जनावरांचे वेळोवेळी नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी, संतुलित आहार आणि गोठ्याचे स्वच्छ व्यवस्थापन यांचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. या सविस्तर मार्गदर्शनानंतर गाय, म्हैस व इतर पाळीव जनावरांना प्रत्यक्ष लस देऊन लसीकरणाची योग्य व सुरक्षित पद्धत शेतकऱ्यांना दाखवण्यात आली. या मोहिमेत कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी माधव दोड, गौरव सुरतकर, जयेश देवकर, जय साबळे आणि मोहन वाघ यांनी सहभाग घेतला. जनावरांचे नियमित लसीकरण केल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, पशुधनाचे आरोग्य चांगले राहते आणि दुग्ध उत्पादनात वाढ होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान टळते, याबाबत विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. राम खर्डे, प्रा. रोहित कनोजे, कार्यक्रम अधिकारी प्रा. पांडुरंग जाधव, विशेष विषय तज्ज्ञ प्रा. ओम जाधव, कार्यक्रम समन्वयक प्रा. हर्षल पोरे यांचे मार्गदर्शन लाभले. पशुपालकांचा निरोगी जनावरांचा संकल्प गावातील बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे. या प्रात्यक्षिकातून मिळालेल्या शास्त्रीय माहितीमुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात मोठी भर पडली. जनावरांचे आजार आणि त्यावर वेळीच करायचे उपाय सविस्तर समजल्यामुळे उपस्थित सर्व पशुपालक व शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या जनावरांचे नियमित लसीकरण करून त्यांना कायम निरोगी ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
Source link
कृषी कार्यानुभव:लाळ खुरकत, घटसर्पावर प्रतिबंधावर मार्गदर्शन, बाभुळगावात जनावरांच्या लसीकरण अभियानाचे प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांचा पुढाकार