Headlines

केळीच्या फळबाग मस्टरवर स्वाक्षरीसाठी 5 हजारांची लाच:औंढा नागनाथमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात!




औंढा नागनाथ तालुक्यातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या शेतीमध्ये फळबागाच्या मस्टरवर स्वाक्षरीकरून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी पाच हजाराची लाच घेतांना सहाय्यक कृषी अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ता. १८ औंढानागनाथ येथे सायंकाळी रंगेहात पकडले. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या शेतामध्ये केळीचे पिक घेण्यात आले आहे. कृषी विभागाच्या फळबाग योजने अंतर्गत सदर पिक घेण्यात आले असून सदर पिकाच्या संदर्भात मस्टरवर स्वाक्षरी करून मस्टर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याची मागणी तक्रारदाराने सहाय्यक कृषी अधिकारी मोहन माने याच्याकडे केली होती. दरम्यान, मोहन याने सुरवातीला टाळाटाळ केली त्यानंतर १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र सदर रक्कम जास्त होत असल्याने दोघांमध्ये तडजोड होऊन पाच हजार रुपये देण्याचे ठरले होते. या प्रकरणी तक्रारदारने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, जमादार भगवान मंडलिक, गजानन पवार, शिवाजी वाघ, शेख अकबर यांच्या पथकाने आज सायंकाळी औंढा नागनाथ येथील बसस्थानकासमोर सापळा रचला होता. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहन माने तेथे आला त्याने तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताच पथकाने त्यास रंगेहात पकडले. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *