Headlines

कोरोनाने पालक गमावलेल्या प्रीतीचा विवाह संपन्न:'सोबत पालकत्व' फाऊंडेशनने दिले कन्यादान, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती




नागपूर येथे कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या प्रीतीचा विवाह शिवमसिंग ठाकूर यांच्याशी संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘सोबत पालकत्व फाऊंडेशन’ने तिचे कन्यादान केले. कोरोनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले असताना, या फाऊंडेशनने प्रीतीच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मी सभागृहात हा विवाह सोहळा पार पडला. माजी आमदार संदीप जोशी आणि देवयानी जोशी यांनी प्रीतीचे कन्यादान केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. या सोहळ्याला माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीची किनार होती. सहा वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीने प्रीतीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. तिने आपले आई-वडील गमावले, तसेच पतीचाही जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. आपल्या दोन लहान मुलांसह तिच्यासमोर नव्याने आयुष्य उभे करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. या कठीण प्रसंगात माजी आमदार संदीप जोशी व देवयानी जोशी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सोबत पालकत्व प्रकल्पा’ने तिला मदतीचा हात दिला. या प्रकल्पांतर्गत तिला केवळ आर्थिकच नव्हे, तर पालकत्वाचा आधारही मिळाला. विशेष म्हणजे, कोरोनाकाळात प्रीतीच्या पतीसाठी रेमडेसिव्हिर मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीनेच नंतर तिच्या आयुष्यात स्थैर्य आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्याने प्रीतीसह तिच्या दोन मुलांचाही स्वीकार करण्याचे वचन दिले. विवाह सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात घरातील कर्ता पुरुष गमावल्याने अनेक महिलांचे भवितव्य अंधकारमय झाले होते. त्यावेळी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून संदीप जोशी पुढे आले. जवळपास २९३ परिवारांची नोंदणी झाली, यापैकी शंभर परिवारांचे पालकत्व मी स्वीकारले आहे. त्यांच्या शिक्षण तसेच इतर गरजांकडे लक्ष दिले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *