![]()
अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव (ता. नेवासा) येथे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा महामार्गाचे ‘पार्किंग’ झाल्याचे वास्तव समोर आले. प्रशासनाचा ढिसाळ कारभार, पावसामुळे उघडे पडलेले खड्डे आणि जोडीला शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार यामुळे घोडेगावातील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला. त्यामुळे अवघ्या अर्धा किमीचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना अर्धा ते पाऊण तास घामाघूम व्हावे लागत होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आठवडे बाजारामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली. काही वेळातच शनिशिंगणापूर फाटा ते तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपआवाराच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य पाहून सोनई व शनिशिंगणापूर पोलिस दलातील ८ कर्मचारी, ६ होमगार्ड आणि काही स्थानिक पोलिस मित्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरले. मात्र, वाहनांची प्रचंड संख्या आणि रस्त्याची झालेली दुरावस्था यापुढे यंत्रणा तोकडी पडत होती. सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास एक रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकून पडली होती. त्यातच, अहिल्यानगरकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या काही घाईगर्दीतील वाहनचालकांनी दुभाजक ओलांडून वाहने विरुद्ध दिशेने घुसवायला सुरुवात केली. त्यामुळे समोरून येणारी वाहतूकही जागीच ठप्प झाली. ४ महिन्यात दोनदा कोंडी घोडेगाव हे शनिशिंगणापूरचे मुख्य प्रवेशद्वार आणि बाजाराचे ठिकाण असल्याने येथे कोंडी नवीन नाही. यापूर्वी १६ मे (शनैश्चरी अमावस्या) रोजी ९ तास आणि ३१ जुलै रोजी (आठवडे बाजार) ४ तास अशीच ३ ते ४ किलोमीटरपर्यंत लांब रांग लागून महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. खड्ड्यांचे ग्रहण व बेशिस्त वाहतुकीमुळे वारंवार होणाऱ्या या कोंडीमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Source link
खड्ड्यांचं ग्रहण व बाजारामुळे घोडेगावात महाकोंडी:4 महिन्यात दोनदा कोंडी