Headlines

भीमेला पूर, सीनेत पाणी,"माण’ तहानलेलीच:उजनीचे पाणी सोडण्याबाबत राजकीय उदासीनता; बंधारे अजूनही पूर्णपणे कोरडे ठणठणीत




पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीचे पात्र आणि त्यावरील सर्व के. टी. बंधारे अजूनही पूर्णपणे कोरडे ठणठणीत पडले आहेत. एकीकडे भीमा नदीला यंदा दोन वेळा पूर आला असला, तरी तिची उपनदी असलेली माण नदी मात्र पाण्याच्या थेंबासाठी तरसत आहे. भीमा-सीना प्रकल्पातून सीना नदीत पाणी सोडण्यात आले परंतु माण नदी बाबत दुजाभाव केला जात असल्याची तक्रार शेतकरी करु लागले आहेत. माण नदीच्या खोऱ्यात यंदा अत्यल्प पाऊस झालेला आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून माण नदी कोरडी ठणठणीत पडलेली आहे. नदीकाठच्या दोन्ही बाजूची भूजल पातळी खालावली आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले तरी अद्यापही माण खोऱ्यात पाऊस नाही. त्यामुळे अद्यापही नदी कोरडी असून पिके अडचणीत आलेली आहेत. तातडीने बंधारे भरण्याची मागणी ! माण नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे (केटीवेअर) कोरडे ठाक असल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उजनी कालव्यातून अथवा उपलब्ध योजनेतून माण नदीत पाणी सोडून सर्व बंधारे भरून द्यावेत, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. जुनोनी- जवळा परिसर (सांगोला-पंढरपूर सीमा) येथे उजनीच्या उजव्या मुख्य कालव्याची एक उप-वितरिका सांगोला तालुक्यातून पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर येते. या कॅनॉलमधून जोडणी करून माण नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी एस्केप तयार करण्यात आलेला आहे. सांगोला भागाला याचा लाभ होऊ शकतो. सांगोल्यात पाणी, मग पंढरपूरवर शेजारील सांगोला तालुक्यात टेंभू योजनेतून नदीपात्रात पाणी सोडून बंधारे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र, पंढरपूर तालुक्यातील माण नदीच्या बाबतीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पूर्णपणे ‘बघ्याची भूमिका’ घेत आहेत. सांगोला तालुक्याला पाणी मिळते, मग पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या गावांसाठी उजनीचे पाणी का सोडले जात नाही, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. भोसे आणि खर्डी परिसर (पंढरपूर तालुका) येथे भोसे प्रादेशिक योजनेअंतर्गत आणि खर्डी गावाजवळून जाणाऱ्या उजनीच्या उप-कालव्यांच्या जोडणीतून माण नदीच्या पात्रात किंवा नदीला मिळणाऱ्या ओढ्यांमध्ये पाणी सोडून नदीत वळवले जाते. नदीवरील तपकिरी शेटफळ, सिध्देवाडी, सरकोली, पन्हाळी बंधारे भरुन घेता येतात. या गावांना होऊ शकतो पाण्याचा लाभ माण नदी पात्रामध्ये उजनी कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर माण नदीत पाणी सोडले होते. गुंजेगाव, मारापूर, घरनिकी, मल्लेवाडी, शरदनगर, सिद्धेवाडी, ढवळस, धर्मगाव, नेपतगाव, तावशी, गार अकोले, सरकोली, सिध्देवाडी, तरटगाव, चिंचोळे, तावशी, तनाळी, तपकीरी शेटफळ, ओझेवाडी या गावच्या शेतकरी व पशुपालकांना त्याचा लाभ होऊ शकतो. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव लोकप्रतिनिधींच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे उजनी कालव्यातून माण नदीत पाणी सोडण्यात यश आलेले नाही, असा थेट आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. माण परिसर आणि नदीकाठच्या भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. पाणी नसल्यामुळे विहिरी व कूपनलिकांची पातळी खालावली असून पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *