![]()
अभ्यासाच्या चार भिंतींपलीकडे जाऊन निसर्ग, इतिहास आणि आनंदाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याने शेवगाव तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. एका कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर शहरात आलेल्या पहिली व दुसरीच्या एकूण ३० विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी चांदबिबी महाल परिसराला भेट देत अविस्मरणीय सहलीचा आनंद लुटला. चांदबिबी महाल परिसरात सुरू असलेल्या रिमझिम पावसाने आणि दाट धुक्याने वातावरण अधिकच आल्हाददायक झाले होते. डोंगररांगांवर पसरलेले धुके, हिरवाईने नटलेला परिसर आणि पावसाच्या सरी यामुळे चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणित झाला. या निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी मनसोक्त डान्स करत आनंद व्यक्त केला. काही विद्यार्थ्यांनी परिसरातील निसर्गसौंदर्य न्याहाळत त्याचे क्षण आपल्या मनात साठवले. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनाचा आनंद मिळाला नाही, तर ऐतिहासिक वारशाची माहितीही मिळाली. शिक्षक तात्यासाहेब बोडखे आणि युवराज जगताप यांनी विद्यार्थ्यांना चांदबिबी महालाचा इतिहास, त्याचे महत्त्व तसेच परिसराची वैशिष्ट्ये याबाबत माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला चालना मिळाली. पावसाच्या सरींमध्ये धुक्याने वेढलेला चांदबिबी महाल आणि त्याच्या सान्निध्यात उत्साहाने बागडणारे चिमुकले, असे मनोहारी चित्र यावेळी पाहायला मिळाले.‘शिकणे म्हणजे केवळ वर्गातील पुस्तके नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातूनही ज्ञान मिळवणे’, या विचारातून शिक्षकांनी घेतलेल्या पुढाकाराचे पालकांकडूनही कौतुक होत आहे. रिमझिम सरी, धुक्याची चादर आणि चांदबिबी महालाचा ऐतिहासिक वारसा अशा तिहेरी अनुभवामुळे बेलगावच्या चिमुकल्यांची ही सहल त्यांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली. अविस्मरणीय सहलीची आठवण म्हणून चिमुकल्यांचा शिक्षकांसोबत चांदबिबी महालासमोर टिपलेला आनंदाचा क्षण.
Source link
धुके, पाऊस अन् डान्स; चांदबिबी महालावर अविस्मरणीय सहल:पहिली-दुसरीच्या 30 विद्यार्थ्यांनी घेतला निसर्गाचा आनंद; ऐतिहासिक वास्तूचीही घेतली माहिती