![]()
तालुक्यातील युवकांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा गौरव करणारा भव्य सत्कार सोहळा मंगळवार (२ जून) रोजी गोळेगाव ग्रामपंचायत पाटांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तिपर वातावरणात पार पडला. भारतीय सैन्यदलाच्या ‘अग्निवीर’ भरतीत निवड झालेल्या परिसरातील १२
.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व शिव आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिव आरतीचा मान हा निवड झालेल्या सर्व अग्निवीर युवकांना देण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी युवकांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रामगीता देऊन गौरवण्यात आले. देशसेवेसाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या माता-पित्यांचाही या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संतोष जोशी म्हणाले, “सध्या स्पर्धेचे युग आहे. विविध क्षेत्रात स्वप्न साकार करताना सर्वांनाच पहिल्या प्रयत्नात यश मिळते असे नाही. ज्यांना अपयश आले त्यांनी खचून न जाता आपल्या प्रयत्नात कुठे त्रुटी आहे ते शोधले पाहिजे. मागील अनुभव आणि त्रुटी दुरुस्त करून पुन्हा जिद्दीने, चिकाटीने ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
या वेळी भाऊसाहेब वाकळे, राजेश भोसले आणि प्रकाश वाकळे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, युवकांनी आपला मौल्यवान वेळ स्वतःला घडवण्यात लावला पाहिजे. विनाकारण व्यसनाधीनतेकडे जाऊन आणि दूषित राजकारणाकडे अनावश्यक लक्ष देऊन स्वतःचे आयुष्य बरबाद करू नये. आई-वडील आणि गावातील ज्येष्ठ मंडळींनीदेखील युवकांवर लक्ष ठेवून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी रोज प्रयत्न केले पाहिजेत.
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना या कार्यक्रमात उपस्थित सर्व युवकांनी आणि त्यांच्या माता-पित्यांनी यशापर्यंत पोहोचण्याचा आपला खडतर प्रवास सांगितला. हा प्रवास सांगताना अनेक युवक आणि पालक भावुक झाले होते, तर काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. बहुतांश सर्व युवकांचे आई-वडील हे शेतकरी आहेत. भडजी येथील अजिनाथ गवळे यांनी विहिरीचे कष्टाचे काम करून, परिस्थितीला आडवे येऊ न देता आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या कष्टाचे आज चीज झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.