![]()
जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षांमुळे कुठल्याही क्षणी तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती आहे. अशा काळात जगात काही विध्वंसक शक्ती संस्कृती नष्ट करण्याचे काम करत आहेत. भारतासह विविध देशांमध्ये मार्क्सवादी डाव्या विचाराच्या वाळवीने शिक्षण संस्था, प्रसारमाध्यमे, चित्रपट, साहित्य, राजकीय पक्ष आणि न्यायव्यवस्थेला पोखरून मोठे संकट निर्माण केले आहे. आपली कुटुंबव्यवस्था, धर्म आणि देशप्रेम संपवण्याचा हा डाव असून, या डाव्या वाळवीचा धोका वेळीच ओळखून जागरूक व्हा, असे आवाहन लेखक अभिजित जोग यांनी केले. विचार भारती आयोजित सोळाव्या ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाले चे उद्घाटन रविवारी वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज यांच्या हस्ते व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘देशाला पोखरणारी वाळवी’ या विषयावर जोग बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक नंदन कामत, विचार भारतीचे अध्यक्ष अरुणराव कुलकर्णी, ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र मुळे, सचिव सुधीर लांडगे उपस्थित होते. जोग यांनी जागतिक स्तरावरील ‘सांस्कृतिक मार्क्सवादा’च्या षडयंत्रावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, अमेरिका आणि युरोपमध्ये कौटुंबिक व्यवस्था उद्ध्वस्त केल्यानंतर आता या शक्तींचा रोख भारताकडे आहे. नेपाळ, बांगलादेशमध्ये अस्थिरता निर्माण करून आता भारतात ‘अल्टरनेट पॉलिटिक्स’ची (पर्यायी राजकारण) घातक संकल्पना पेरली जात आहे. भारत लवकरच जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. निकोबार बेटावर होणाऱ्या ‘ट्रान्सशिपमेंट पोर्ट’मुळे भारत मलाक्काच्या समुद्रधुनीवर मजबूत पकड निर्माण करेल. या ‘ग्रेट निकोबार प्रोजेक्ट’मुळे भारताची आर्थिक व सामरिक ताकद प्रचंड वाढणार आहे. परिणामी, हा प्रकल्प रोखण्यासाठी चीन, अमेरिका आणि ‘डीप स्टेट’ सारख्या भारतविरोधी शक्ती एकवटल्या असून त्याद्वारे प्रकल्पाविरोधात अपप्रचार केला जात आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण करून भारत जगाला आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वास जोग यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात ‘अहिल्यानगर गौरव गीता’ने झाली. प्रास्ताविकात रवींद्र मुळे यांनी व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. प्रारंभी माऊली सभागृहातील विठ्ठल-रुक्मिणी व ज्ञानेश्वर महाराजांची आरती करण्यात आली. प्रशांत आढाव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेंद्र पाचे, राहुल गांधी व गिरीश अग्रवाल यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश कुलकर्णी यांनी, तर आभार श्रेयस लहामगे यांनी मानले. समाज परिवर्तनासाठी चांगल्या विचारांची गरज व्याख्यानमालेचे उद्घाटक वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज म्हणाले, भगवंताने मानवाला दिलेले विचारस्वातंत्र्य आणि सामर्थ्य यावरच त्याचे जीवन अवलंबून असते. संत महंतांनी मानवाच्या कल्याणाचे विचार मांडले आहेत. आज समाज परिवर्तनासाठी संपूर्ण मानवजातीला चांगल्या विचारांची नितांत गरज असून, विचार भारती हेच कार्य नि:स्वार्थपणे करत आहे, असे ते म्हणाले.
Source link
ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमाला:देशाला पोखरणाऱ्या डाव्या विचाराच्या वाळवीचा धोका ओळखा, लेखक अभिजित जोग यांचे आवाहन