![]()
हिंगोली तालुक्यातील कारवाडी शिवातील उड्डाणपुला जवळ दुचाकीवर आलेल्या तिघांनी एका दुचाकीस्वारास मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 10 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता त्या तीन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथील अविनाश वाढवे हे हिंगोली येथे दुचाकी दुरुस्तीचे काम करतात. त्यासाठी दररोज पिंपरखेड येथून हिंगोली येथे येतात अन रात्री काम आटोपून परत गावाकडे जातात. दरम्यान, नेहमी प्रमाणे अविनाश हे मंगळवारी ता. 7 रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकी वाहनावर हिंगोलीकडून पिंपरखेड येथे जात होते. त्यांचे दुचाकी वाहन कारवाडी शिवारातील उड्डाणपुला जवळ आले असतांना दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या दुचाकी वाहनाला लाथ मारून खाली पाडले. त्यामुळे अविनाश यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन ते खाली पडले. यावेळी चोरट्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अविनाश घाबरुन गेले. तिघांच्या मारहाणीपुढे ते प्रतिकार करू शकले नाही. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या जवळील 12 हजार रुपये रोख व एक मोबाईल असा 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पळ काढला. त्यांनतर काही वेळाने अविनाश यांनी गावात जाऊन सदर प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी ता. 10 हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी तीन चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक सतिष वाघ, पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक राहुल घुले, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादारा बाळासाहेब खोडबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपनिरीक्षक घुले पुढील तपास करीत आहेत.
Source link
हिंगोलीत हायवेवर थरार:कारवाडी उड्डाणपुलाजवळ दुचाकीस्वाराला लाथ मारून पाडले; मारहाण करत 25 हजारांचा मुद्देमाल लुटला, तिघांवर गुन्हा दाखल