![]()
आगामी २७ तारखेला येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, येथील प्रसिद्ध शेळी बाजारात बोकडांची विक्रमी आवक झाली. तर एका देखण्या बोकडाला तब्बल १ लाख ११ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. हा व्यवहार संपूर्ण बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, नाशिक, कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी बोकड खरेदी-विक्रीसाठी बाजारात दाखल झाले होते. ईदसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी खास राखून ठेवलेले बोकड विक्रीसाठी आणल्याने आज बाजारात विक्रेत्यांची आणि खरेदीदारांची मोठी गर्दी होती. नेहमी सकाळी १० वाजेपर्यंत चालणारा हा बाजार आज खरेदी-विक्रीच्या उत्साहामुळे दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरू होता. आजच्या बाजारात तोतापुरी, संगमनेरी, बिटल, गावरान आणि राजस्थानी कोटा अशा विविध जातींच्या दर्जेदार बोकडांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. यात प्रामुख्याने एक वर्णी (एकाच रंगाचे) आणि कपाळावर ‘चाँद’ (चंद्रासारखा पांढरा ठिपका) असलेले बोकड भाव खाऊन गेले. काही शेतकऱ्यांनी वर्ष-दोन वर्ष विशेष खुराक देऊन तयार केलेले तजेलदार बोकडही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होते. आजच्या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरला तो पांगरमल येथील गणेश आव्हाड यांचा ‘राजस्थानी कोटा’ जातीचा बोकड. साधारण १२० ते १२५ किलो वजनाचा, अंगावर सुंदर झुल, शिंगांना रंगीबेरंगी गोंडे आणि पायात घुंगरू बांधून सजवलेला हा देखणा बोकड पाहण्यासाठी बाजारात एकच गर्दी झाली होती. या बोकडाची किंमत सुरुवातीला सव्वा लाख रुपये होती. अखेर अनेक व्यापाऱ्यांमधील चुरशीनंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे व्यापारी आदिलभाई खाटिक यांनी १ लाख ११ हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावून हा बोकड खरेदी केला. ७५० बोकडांची बाजारात झाली आवक घोडेगाव उपआवारात शुक्रवारी एकूण ७५० बोकडांची आवक झाली. त्यापैकी ६२० बोकडांची यशस्वी विक्री झाली. एकाच दिवसात बाजारात तब्बल सव्वा कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. यातून बाजार समितीला ११ हजार रुपयांची बाजार फी वसूल झाली, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे व शाखा व्यवस्थापक संभाजी पवार यांनी दिली. थेट सांगलीहून पसंती ^घोडेगाव येथील बकरांचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथे अत्यंत रास्त आणि योग्य भावात बकरं मिळतात. म्हणूनच आम्ही थेट इस्लामपूर (जिल्हा सांगली) येथून नेहमी खरेदीसाठी येथे येतो. विशेषतः बकरी ईदसाठी लागणारी बकरांची उत्तम व्हरायटी आणि प्रकार येथे पाहायला मिळतात, त्यामुळे आम्ही हा बाजार चुकवत नाही. – आदिलभाई खाटिक (खरेदीदार व्यापारी, इस्लामपूर)
Source link
घोडेगाव बाजारात बोकडाला 1 लाख 11 हजारांचा भाव:‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर सव्वा कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त