![]()
पुणे येथील चाकण औद्योगिक वसाहतीतील खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे लघु व मध्यम उद्योगांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमुळे सुमारे 20 लघुउद्योग स्थलांतराच्या तयारीत असून, यामुळे 2 हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि हजारो रोजगार धोक्यात येण्याची शक्यता आहे. उद्योजकांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. चाकण एमआयडीसी हे देशातील प्रमुख वाहननिर्मिती औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे. मात्र, येथील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यामुळे पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठीही दोन तासांपर्यंत वेळ लागत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. पावसामुळे रस्त्यांची स्थिती आणखी बिकट झाली आहे. अरुंद रस्ते, अतिक्रमणे आणि रस्त्यावर उभे केलेले ट्रक यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. याचा परिणाम कामगारांच्या पाळ्यांवर तसेच कच्च्या व तयार मालाच्या वाहतुकीच्या वेळापत्रकावर होत आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान, इंधनाचा वाढीव खर्च आणि देखभालीचा खर्चही वाढला आहे. उद्योजकांच्या मते, पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे गेल्या काही वर्षांत ५० हून अधिक उद्योग इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. यामुळे चाकणचा औद्योगिक दर्जा गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. उद्योजकांनी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यात अंतर्गत व मुख्य रस्त्यांवरील खड्डे 15 ते 30 दिवसांत दुरुस्त करून कामाची यादी व अंतिम मुदत जाहीर करावी, ‘चाकण रोड सेल’ स्थापन करून तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, तसेच वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ट्रक टर्मिनल व सामाजिक सुविधांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यांचा समावेश आहे. याशिवाय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती, सीसीटीव्ही व्यवस्था, वीज-पाणीपुरवठ्याची विश्वासार्हता आणि संबंधित विभागांचा संयुक्त आढावा घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे. “पाच किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोन तास लागत असतील, तर ही केवळ प्रवासाची समस्या राहत नाही; ती उत्पादन आणि रोजगाराची समस्या बनते. पायाभूत सुविधा अपयशी ठरल्यास गुंतवणूक बाहेर जाते,” असे उद्योजकांनी म्हटले आहे.
Source link
चाकण एमआयडीसीतील दुरवस्थेमुळे 20 लघुउद्योग स्थलांतराच्या तयारीत:2 हजार कोटींची उलाढाल अन् हजारो रोजगार धोक्यात