Headlines

शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा लढा अटळ:21 तारखेला सांगलीत विराट मोर्चा, जयंत पाटील आणि राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात




राज्य सरकारच्या नियोजित ‘शक्तिपीठ महामार्गा’ला होणारा विरोध आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी येत्या २१ तारखेला सांगलीत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. २१ तारखेला सांगलीत विराट मोर्चा : जयंत पाटील पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी मोर्चाची माहिती दिली. ते म्हणाले, “शक्तिपीठ महामार्गाविरोधात जनतेच्या मनात तीव्र रोष आहे. जनतेच्या याच भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी २१ तारखेला सकाळी ११ वाजता सांगलीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.” हा महामार्ग होऊ नये यासाठी ज्या-ज्या भागातून हा रस्ता जाणार आहे, तिथे याआधीही अनेक मोर्चे काढण्यात आल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. ‘४५ हजारांचा रस्ता १ लाख १० हजार कोटींत कशासाठी?’ : राजू शेट्टींचा सवाल या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी अतिशय आक्रमक भाषेत राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. सरकारने आमच्याशी नाही, तर किमान शेतकऱ्यांसोबत तरी चर्चा करायला हवी होती.” प्रकल्पाच्या खर्चावर गंभीर आरोप करताना शेट्टी म्हणाले, “जो रस्ता ४५ हजार कोटींमध्ये होणार होता, तो आता १ लाख १० हजार कोटी रुपयांत करायचा घाट घातला जात आहे. हे सर्व कशासाठी केले जात आहे, हे जनतेला कळत नाही का? मुळात हा शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे अनावश्यक आहे. सरकार जाणीवपूर्वक आपली जबाबदारी टाळत आहे.” मूलभूत सुविधांचा अभाव अन् टोलचा सुळसुळाट राज्यातील इतर प्रश्नांकडे लक्ष वेधताना शेट्टींनी सरकारला खडे बोल सुनावले. “राज्यातील सरकारी दवाखान्यांची वाईट अवस्था जाऊन बघा. सरकारकडून जनतेला साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. दुसरीकडे, राज्यात हळूहळू टोल नाक्यांची संख्या एवढी वाढली आहे की, आता सरकारने नेमकं करायचं काय?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. लढा अटळ, तरुणही होणार सहभागी या आंदोलनात सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेसोबतच तरुण पिढीही उतरणार असल्याचे शेट्टींनी स्पष्ट केले. “आमच्या या मोर्चात ‘झेन-झी’ म्हणजेच आजची तरुण पिढीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. समाजाप्रती आमचीही काही जबाबदारी आहे, त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत हा शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा अटळ आहे,” असा स्पष्ट इशारा राजू शेट्टी यांनी दिला. हेही वाचा.. घाटकोपरमध्ये दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू: 4 जण जखमी; कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधमोहीम, अरुंद गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळे मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. येथील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर अचानक डोंगराचा मोठा कडा (दरड) कोसळल्याने दोन ते तीन घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, 4 जण जखमी झाले आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *