![]()
अतिशय धाडसी सेनानी असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. आजच्या इतके आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही त्यांनी एक आदर्श आणि लोककल्याणकारी राज्यकारभार चालवून दाखवला. सर्वसामान्यांवर कदापि अन्याय होऊ नये, हीच त्यांची भूमिका असायची. कोणत्याही नागरिकाला प्रशासनाचा जाच होणार नाही, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. याच संकल्पनेनुसार सध्या ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत असून, प्रशासनाची ही सजगता थेट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ६ जून हा शिवराज्याभिषेक दिन ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिया यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून हा दिन साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शिवरायांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचा गौरव केला. ते म्हणाले, “जनतेसाठी आदर्श राज्य कसे चालवायचे, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शिवशाही आहे. शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास ३६० गड-किल्ले बांधले. ते स्वतः अतिशय कसबी आणि कुशल इंजिनिअर होते. म्हणूनच, आजही साडेतीनशे वर्षांनंतर तो ऐतिहासिक ठेवा आपल्याला अभेद्य स्वरूपात पाहायला मिळतो. विविध शासकीय उपक्रम राबविताना प्रशासनाने शिवरायांच्या याच आदर्श पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भिंगार छावणी परिषद जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित अंगावर रोमांच उभे करणारे पोवाडे सादर केले. या विद्यार्थ्यांना शिक्षक स्नेहल लवांडे, मनीषा गायकवाड आणि आदिनाथ वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या बालशाहीर आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या सोहळ्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, संध्या गायकवाड, शिवम डपकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक रवींद्र आगलावे यांनी, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी मानले.
Source link
छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अभियान राबवावे:जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे प्रतिपादन, पोवाड्यांनी जिंकली मने