Headlines

जय श्रीराम म्हणत महागाई सहन करा:संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले- आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील




पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिक त्रस्त झाले असताना सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असताना देशातील नागरिकांवर आर्थिक भार टाकला जात असल्याचे राऊत म्हणाले. जनतेला गरीब व्हावं लागेल आणि काही मोजक्या उद्योगपतींचे हित जपले जाईल, असा टोला त्यांनी लगावला. तसेच गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील खटल्यांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, मोठ्या लोकांना न्याय मिळतो, पण सामान्यांना आणि विरोधकांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि रोहिणी खडसे यांनी देखील महागाईच्या मुद्यावरुन सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी महागाईच्या मुद्द्यावरून अधिक आक्रमक भूमिका घेतली. देशात महागाई आणखी वाढणार असून मध्यमवर्गीयांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. या परिस्थितीत आर्थिक अराजक निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर भाजपावर निशाणा साधताना, महागाई वाढली की त्यासाठी मुस्लिम किंवा पाकिस्तानला जबाबदार ठरवलं जाईल, अशी टीकाही त्यांनी केली. मग आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील आणि पुन्हा भाजपालाच मतदान करतील, असे म्हणत त्यांनी सरकारच्या राजकारणावर उपरोधिक भाष्य केले. एकाच आठवड्यात इंधनाच्या किमती दुसऱ्यांदा वाढल्या आहेत. आता रुपया पूर्णपणे कोसळला आहे. किमती वाढल्या आहेत. यात नवीन काय आहे? हे तर घडणारच होते. जर तुम्ही भाजपचे समर्थक असाल, तर फक्त ‘जय श्री राम’चा जयघोष करा; म्हणजे किमती 10 रुपयांनी कमी होतील. ‘जय श्री राम’ म्हणा आणि सर्व काही उपलब्ध होईल, हाच तर भारतीय जनता पक्षाचा मंत्र नाही का? आमच्यासारखे लोक मात्र संघर्ष करणे, लढा देणे, निदर्शने करणे आणि आंदोलने करणे हे सुरूच ठेवतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी जुन्या काळातील महागाईविरोधातील आंदोलनांची आठवण करून दिली. पूर्वी महिलांचे मोर्चे निघायचे, विद्यार्थी रस्त्यावर उतरायचे, रस्ता रोको आंदोलनं व्हायची. पण आता अशा आंदोलनांना देशद्रोह ठरवलं जातं, असा आरोप त्यांनी केला. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचाही दावा त्यांनी केला. लोकांनी महागाईमुळे त्रस्त होऊन गप्प बसायचं, नाहीतर आवाज उठवला तर कारवाईला सामोरं जायचं, अशी परिस्थिती असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांप्रमाणेच सामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारही योग्य मार्गाने सत्तेत आलेलं नाही यावेळी संजय राऊत यांनी भाजप सरकारच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय जनता पक्ष हा जमिनीवरचा पक्ष नाही आणि त्यांचं सरकारही योग्य मार्गाने सत्तेत आलेलं नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. जर भाजपने पुन्हा फेरनिवडणुका घेतल्या, तर जनता कोणाच्या बाजूने उभी आहे हे स्पष्ट होईल, असे आव्हान त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामान्य माणसावरच भुर्दंड टाकणं अन्यायकारक – रोहित पवार महागाई वाढीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, पेट्रोल-डिझेल दरवाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असतं, त्यामुळं आठवड्यातच पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसरी वाढ ही सामान्य माणसाला कदापि न परवडणारी आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन असो किंवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग असो… पांढरा हत्ती म्हणूनच पोसण्यात येणाऱ्या देशभरातील अशा प्रकल्पांना स्थगिती दिली आणि अनावश्यक सरकारी खर्चाच्या उधळपट्टीला ब्रेक लावला तरी मोठ्या प्रमाणात बचत होईल, पण त्याऐवजी पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करुन सामान्य माणसावरच भुर्दंड टाकणं हे अन्यायकारक आहे. कटना तो खरबूजे को ही है – रोहिणी खडसे रोहिणी खडसे यांनी देखील महागाईच्या मुद्यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, मागच्या वेळी पेट्रोल डिझेलच्या भावात घसघशीत ३ रुपये वाढवले होते.‌ त्यामुळे लोकांनी केंद्रात सत्तेवर बसलेल्या भाजपला गल्लीपासून दिल्लीपर्यंत झोडपून काढले होते. या गोष्टीतून धडा घेत आज पेट्रोलचे दर ८७ पैशांनी तर डिझेलचे दर ९१ पैशांनी वाढवलेले दिसत आहे. आज देशाची जी परिस्थिती आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात असंच कलेकलेने दरवाढ करेल असं दिसतंय. पण शेवटी काय ? पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भुर्दंड हा सामान्य जनतेला सहन करायचाच आहे… चाकू खरबूजे पर गिरे या खरबूजा चाकू पर, कटना तो खरबूजे को ही है !



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *