Headlines

जलसंकट टळले, मजीप्रा कंत्राटदारांचे आंदोलन मागे:आमदार संजय खोडके यांच्या मध्यस्थीने प्रश्न सुटला




महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) कंत्राटदारांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन गुरुवारी सायंकाळी मागे घेतले. आमदार संजय खोडके यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हे आंदोलन थांबले असून, अमरावती शहरातील संभाव्य पाणीसंकट टळले आहे. आमदार खोडके यांनी कंत्राटदारांना त्यांच्या प्रलंबित रकमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली असून, येत्या आठवडाभरात कंत्राटदारांना त्यांची देयके मिळतील, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर कंत्राटदारांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. आंदोलन मागे घेतल्यानंतर पंप हाऊसवरील कर्मचारी तसेच शहराच्या विविध भागांत पाणी सोडणारे व्हॉल्वमॅन शुक्रवारपासून त्यांचे कामकाज नियमितपणे पार पाडणार आहेत. यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास मदत होईल. अमरावती येथील कंत्राटदारांना मजीप्राकडून सुमारे १५ कोटी रुपये येणे बाकी आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ही रक्कम न मिळाल्याने कंत्राटदारांपुढे गंभीर आर्थिक संकट उभे राहिले होते. आंदोलनकर्त्यांचे नेते धनंजय बंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चर्चेदरम्यान हा मुद्दा आमदार खोडके यांच्या निदर्शनास आणून दिला. कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे गुरुवारी शहराच्या काही भागांत पाणी पोहोचले नाही. सिंभोरा येथील पंपहाऊसचे ऑपरेटर आणि शहरात पाणी सोडणारे व्हॉल्वमॅन कामावर नसल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. दरम्यान, मजीप्राचे मुख्य अभियंता साळुंके आणि उपविभागीय अभियंता संजय लेवरकर हे गेल्या दोन दिवसांपासून याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत तळ ठोकून होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *