Headlines

जाधव गुरुजींची शिक्षण सेवा, समर्पण अन् कार्य प्रेरणादायी:स्वामी जितेंद्रनाथ महाराज, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार‎




लक्ष्मण जाधव गुरुजींनी आयुष्यभर शिक्षण, संस्कार, समाजसेवा आणि अध्यात्म या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्या अंगीभूत असलेल्या अनेक कौशल्याचा वापर करत साभिनय पद्धतीने शिक्षण देण्यावर भर दिल्यामुळे ते विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक झाले. नाटक, वक्तृत्व, लेखन, पत्रकारिता अशा विविधांगी पैलूंच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेकांना योग्य दिशा देत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी योगदान दिले आहे. जाधव गुरुजींचे साधेपण, विनम्रता आणि लोकांप्रती असलेला जिव्हाळा हा प्रत्येकासाठी आदर्श आहे. त्यांची सेवा, समर्पण आणि सत्कर्म यातून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात मानाचे स्थान मिळवले असे प्रतिपादन श्रीनाथ पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केले. ते लक्ष्मण जाधव गुरुजी यांच्या अमृत महोत्सव व नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी संत सचिन देव महाराज होते तर प्रमुख अतिथी म्हणून संपादक अनिल अग्रवाल, वासुदेव महाराज महल्ले, तसेच सत्कारमूर्ती लक्ष्मण जाधव गुरुजी व शुभदा जाधव, श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयाच्या कांचनमाला गावंडे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी वासुदेव महल्ले महाराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जाधव गुरुजी हे नाव केवळ व्यक्तीचे नसून संस्कार, सेवा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. त्यांनी आयुष्यभर समाजहिताचा विचार केला असून अनेकांना योग्य दिशा दिली आहे. अनिल अग्रवाल यांनी मनोगतात सांगितले की, समाजात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही संस्कृती जपली पाहिजे. जाधव गुरुजींसारख्या व्यक्तींमुळे समाजातील सकारात्मकता वाढते. त्यांच्या कार्याचा आदर्श तरुण पिढीने नक्की घ्यावा व निकोप आयुष्य बनवावे. आपल्या अध्यक्षीय भाषणात संत सचिन देव महाराज यांनी जाधव गुरुजींच्या कार्याचा गौरव करत व्यक्ती ही आपल्या कार्यानेच मोठी होत असते असे आवर्जून सांगितले. याप्रसंगी आदर्श शिक्षक म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या लक्ष्मण जाधव गुरुजींचा सचिन देव महाराज व जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व मानपत्र देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. मानपत्राचे लेखन प्रा.डॉ. हरिदास आखरे यांनी केले, तर मानपत्राचे वाचन प्रा.डॉ. सुशील गावंडे यांनी केले. याप्रसंगी राजकीय पक्षांचे व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, जाधव गुरुजींचे आप्तेष्ट, मित्र परिवार उपस्थित होते. अमृतमयी जाधव गुरूजी पुस्तकाचे प्रकाशन जाधव गुरुजींवर लिहिण्यात आलेल्या अमृतमयी जाधव गुरुजी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकामध्ये अनेक मान्यवरांनी लिहिलेल्या लेखातून जाधव गुरुजींच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. या पुस्तकाचे संपादन प्रा.डॉ. नरेंद्र माने, प्रा.डॉ. हरिदास आखरे, प्रा.डॉ.रणजीत गणोदे, प्रा.डॉ.सुशील गावंडे व प्रा.विद्या जाधव यांनी केले. याप्रसंगी जाधव गुरुजींच्या जीवन प्रवासावर चित्रपट दिग्दर्शक निलेश जळमकर तथा गौरव जाधव यांनी तयार केलेल्या दोन चित्रफिती दाखवण्यात आल्यात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.नरेंद्र माने यांनी केले, तर आभार ॲड. सदानंद जाधव यांनी मानले. प्रास्ताविक प्रा.डॉ. रणजीत गणोदे यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *