![]()
डफरीन हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर स्फोटाचे प्रकरण ताजे असतानाच अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) व्हेंटिलेटर खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. जीएसटीसह १३.१२ लाख रुपये मूळ किंमत असलेले व्हेंटिलेटर तब्बल २२.५५ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी याबाबत सप्रमाण आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. राज्याचे अर्थ व नियोजन खाते सांभाळलेले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी या संदर्भात वेगवेगळ्या व्हेंटिलेटर कंपन्यांकडून कोटेशन मागवून ही बाब अधिक स्पष्ट केली आहे. जिल्हा नियोजन समितीद्वारे (डीपीसी) मिळालेल्या निधीतून जीएमसीने इर्विन रुग्णालयासाठी २० नवीन हॅमिल्टन सी-थ्री व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत. ही खरेदी अमरावतीतील अधिकृत वितरकाकडून न करता वाशिम येथील निर्मल एजन्सी या पुरवठादाराकडून करण्यात आली आहे. अधिक तपासणी केल्यावर निर्मल एजन्सीज, शॉप नं ४, महावीर कॉम्प्लेक्स, अकोला नाका, वाशिम या पत्त्यावर डीलरऐवजी जैन भवन नावाची इमारत आढळली. या इमारतीतील एका विंगेत चार नंबरच्या दुकानात किराणा दुकान, तर दुसऱ्या विंगेतील चार नंबरच्या दुकानात तिखट, हळद विक्रीचे दुकान आढळून आले. ज्या एजन्सीने २० व्हेंटिलेटरचा तब्बल ४.५० कोटी रुपयांचा पुरवठा केला, त्याचे प्रतिष्ठान दिलेल्या पत्त्यावर नसल्याने ही खरेदी अधिकच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन हॉस्पिटल) एम्सच्या धर्तीवर विकसित करणार असल्याचे आणि तेथील साधनसामुग्री एम्सप्रमाणे खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे. जर अधिकाऱ्यांकडून अशीच चुकीची खरेदी पुन्हा-पुन्हा होत राहिली, तर त्यांचे ध्येय अपूर्ण राहील. त्यामुळे डॉ. सुनील देशमुख यांनी या संपूर्ण व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रियेची चौकशी करून गोरगरीब जनतेच्या आरोग्य उपकरणांच्या खरेदीत भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना कायमची अद्दल घडवावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी डॉ. राऊत (निवृत्त डीन) यांनी म्हटले आहे की, “मी एकटा जबाबदार नाही. जीएमसीसाठी आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी संस्था स्तरावर सात सदस्यीय समिती आहे. त्या समितीच्या मान्यतेने ही खरेदी झाली. मी टेंडर काढले. १२ पैकी नऊ कंपन्या नाकारून ३ पैकी एकाची निवड केली गेली. त्यात गोंधळ असेल तर चौकशीदरम्यान समितीमधील कोणी काय-काय केले, हे उघड होईल.”
Source link
जीएमसीमध्ये 13 लाखाचे व्हेंटिलेटर 22 लाखांत खरेदी:भ्रष्टाचार चव्हाट्यावर; माजी पालकमंत्री डॉ. देशमुख यांची विद्यमान पालकमंत्र्यांकडे चौकशीची मागणी