Headlines

'जेन झी' पिढीवर संघाचा पूर्ण विश्वास:सुनील आंबेकर यांचे पुणे श्रमिक पत्रकार संघात प्रतिपादन




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ‘जेन झी’ (Gen Z) पिढीबद्दल संघ आशावादी असल्याचे म्हटले आहे. आजचे तरुण भारतीय परंपरा आणि गौरवाशी जोडले गेले असून, समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे योगदान देत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. या वार्तालाप प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. आंबेकर यांनी संघाच्या शताब्दी वाटचालीसह संघाची नोंदणी, ‘जेन झी’ तरुण, लोकसंख्या असंतुलन आणि मुस्लिम समाजाबाबत संघाची भूमिका स्पष्ट केली. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना आंबेकर म्हणाले की, भारतात सर्वच स्तरांवर लोकशाही मार्गाने निवडणुका होतात. आपली न्यायालये, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. अशा मजबूत लोकशाहीत जर कोणी आवाज उठवत असेल, तर त्याची योग्य दखल घेण्याची क्षमता व्यवस्थेत असायला हवी. त्यामुळे अशा आंदोलनांनी अचंबित होण्याची गरज नाही. संघाच्या नोंदणीसंदर्भात सध्या सुरू असलेल्या चर्चेवर सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका मांडली. ते म्हणाले, संघाच्या नोंदणीसंबंधी कोणताही कायदेशीर वाद नसून केवळ राजकीय फायद्यासाठी याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही कायदेशीरदृष्ट्या मान्यताप्राप्त सामाजिक संघटना आहे. म्हणूनच आजवरच्या सरकारांनी विविध पातळ्यांवर संघाचे सहकार्य घेतले आहे. संघाच्या पथसंचलनांना पोलिसांची अधिकृत परवानगी मिळते, एवढेच नव्हे तर स्थानिक शाखांच्या नावाने बँकेत खातीही उघडली जातात. संघाचे सर्व आर्थिक व्यवहार केवळ बँकेच्या माध्यमातूनच चालतात. मुस्लिम समाज आणि संघ यांच्यातील संबंधांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आंबेकर म्हणाले की, संघाच्या स्थापनेपूर्वीपासूनच देशात हिंदू-मुस्लिम संघर्ष अस्तित्वात आहे. दुर्दैवाने, मुस्लिमांमध्ये ‘धर्म बदलला म्हणजे राष्ट्र आणि इतिहास बदलतो’ अशी भावना निर्माण केली गेली आणि याच फुटीरतावादी मानसिकतेमुळे देशाची फाळणी झाली. हिंदू-मुस्लिमांचा हा वाद आता मिटायला हवा, कारण सर्वांचा डीएनए एकच आहे. आता मुस्लिम समाजातूनही सामाजिक बदलांसाठी सकारात्मक पुढाकार घेतला जात असून, भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानकडे नव्हे, तर इंडोनेशियाच्या सांस्कृतिक आदर्शाकडे पाहिले पाहिजे. लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच संतुलनावर भर देताना आंबेकर यांनी सांगितले की, सध्या युरोप आणि चीनसारख्या देशांनी आपल्या लोकसंख्या धोरणात ‘यू-टर्न’ घेतला आहे. त्यामुळे भारताच्या संदर्भात लोकसंख्येचे संतुलन राखणे अधिक महत्त्वाचे आहे.१९४७ मधील फाळणी ही ‘डेमोग्राफिक’ (लोकसंख्याशास्त्रीय) बदलांमुळेच झाली होती, अशी आठवण करून देत ते म्हणाले, “भविष्यात लोकसंख्येचे असंतुलन झाले, तर देशाची ओळख आणि संस्कृती टिकवणे कठीण होईल. त्यामुळे हिंदू संस्कृतीला मानणाऱ्या लोकांची बहुलता देशाच्या प्रत्येक भागात असायला हवी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *