![]()
प्रतिनिधी | अकोला सध्या जागतिक स्तरावर नैसर्गिक संसाधनांची अपरिमित धूप, हवामान बदल आणि त्याचे शेती आणि मानवाच्या सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम घडून येत आहेत. जैव तंत्रज्ञान आधारित संकल्पनांचा शाश्वत शेती आणि पशुसंवर्धन यांच्याकरिता प्रचंड संधी आहे. त्यामुळे “जीन ते जीनोम’ या संकल्पनेवर आधारित अॅग्री बायो नेक्स्ट २०२६- शाश्वत पीक व पशुसंवर्धन सुधारणेसाठी एकात्मिक जैवतंत्रज्ञान आणि बायोइन्फर्मेटिक्स विषयक आंतरराष्ट्रीय उन्हाळी प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले. पर्यावरण पूरक नवीन वान विकसित करण्याची क्षमता जैव तंत्रज्ञानामध्येच आहे, असे नमूद करताना विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले. आभासी पद्धतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्च, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय कृषी विज्ञान संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन ब्यूरो भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा, नवी दिल्लीचे माजी संचालक डॉ. के. सी. बन्सल आणि देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून शेकडो विद्यार्थी, संशोधक, शास्त्रज्ञ आणि कृषी व्यावसायिक या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमास दक्षिण आशिया जैव तंत्रज्ञान संस्था, जोधपूर, भारतीय तेलबिया संशोधन संस्था हैदराबाद, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अग्रोव्हिजन फाउंडेशन नागपूर, ग्लोबल अलाएन्स सस्टेनेबल डेव्हलपमेट, महाराष्ट्र आणि असोसिएशन ऑफ प्लांट पॅथॉलॉजिस्ट्स, अकोला यांचे सहकार्य लाभले आहे. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन अभ्यासक्रम समन्वयक सुप्रिकेश कडलग यांनी केले. प्रारंभिक उद्बोधन करताना डॉ. एच. के. देशमुख यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि महत्व प्रतिपादित केले. परिसंवाद संचालक म्हणून डॉ. डी. आर. राठोड यांनी केले. आभार डॉ. एन. एम. कोंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय धनोरकर, निखिल आर. यादव, सह-संचालक विजय शिंदे, कोमल कुटे, रुषिकेश आर. ताहाकिक यांनी भूमिका बजावली. वैज्ञानिक दृष्टिकोनातू मांडणी : अतिथी म्हणून डॉ. सी. डी. मायी उपस्थित होते. कापूस पिकाच्या संवर्धनासाठी विश्वभर ओळखले जाणारे डॉ. मायी यांनी अभ्यासक्रमाचा आराखडा व वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. बीटी कापूस आज भारताच्या ९७ टक्के कापूस क्षेत्रावर पिकतो- यात त्यांचे योगदान आहे. प्रा. के. सी. बन्सल यांनी वनस्पती जीनोम संपादन: पीक सुधारणेसाठी मूलतत्त्वे आणि अनुप्रयोग, या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सीआयआयएसपीआर-सीएएस-९ यंत्रणा, हवामान-सहनशील पीक वाण विकास, जनुक-संपादित तांदूळ वाण, धान १०० आणि जनुक-संपादित मेंढी तारमीम यांसारख्या मैलाचा दगड ठरलेल्या उपलब्धींचे त्यांनी सादरीकरण केले. ५ जून रोजी समारोप : उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रजनन विश्लेषण आणि कृषी उद्योजकतेसह विविध विषयांवर २० पेक्षा जास्त विशेषज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी, संशोधक, केव्हीकेचे कर्मचारी, प्राध्यापक आणि प्रगतशील शेतकऱ्यांसह जवळपास ४०० सहभागी या कोर्समध्ये नोंदणीकृत आहेत. ५ जून रोजी डॉ. कॅथलीन हेफेरॉन, कॉर्नेल विद्यापीठ, यांच्या विशेष सत्रासह समारोप होणार आहे. डॉ. गडाख यांनी कृषी विकासातील जैव तंत्रज्ञानाचे महत्व अधोरेखित केले. पर्यावरण पूरक नवीन वान विकसित करण्याची क्षमता जैव तंत्रज्ञानामध्येच आहे, असे नमूद करताना विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. खर्चे यांनी सहभागी प्रशिक्षणार्थी यांना आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील आव्हानांना समर्थपणे सामना करण्यासाठी प्रेरित केले. डॉ. खर्च यांनी नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि जैव तंत्रज्ञान यांचा एकीकृत अंगीकार कृषी विकासासाठी मैलाचा दगड ठरेल असे नमूद केले.
Source link
जैव तंत्रज्ञानामध्येच पर्यावरण पूरकनवीन वान विकसित करण्याची क्षमता:तज्ज्ञांकडून आवाहन कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रम