![]()
तालुक्यात पहिल्याच पावसाने हजेरी लावताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियोजनाचे वास्तव समोर आले आहे. रस्ते आणि पुलांच्या कामांवर लाखो रुपयांचा खर्च करूनही पहिल्याच पावसात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नवीन पूल बनवूनही दळणवळण कोलमडल्याने पूल असून उपयोग काय असा सवाल आता गावकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संथ कारभारामुळे टाकळी ते बाजारसावंगी रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने, पहिल्याच पावसात पुलाशेजारी अथांग पाणी साचले. परिणामी, टाकळी राजेराय रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता. प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मार्ग बदलून रस्ता तात्पुरता सुरू केला असला, तरी या मलमपट्टीमुळे जनतेचा कायमचा प्रश्न सुटलेला नाही. दुसरीकडे, सोनखेडा ते ममनापूर रस्त्यावरील पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. येथे नवीन पूल उभारण्यात आला खरा, पण तो अद्याप सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून हे काम रखडल्याने सोनखेडा गावाचा मुख्य रस्ता बंद आहे. नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने गावाचे दळणवळण पूर्णपणे कोलमडले आहे. शाळा, कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत या अनागोंदीचा फटका सोनखेडा गावातील शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन तरुणांना बसत आहे. उच्च शिक्षणासाठी दररोज खुलताबाद येथे जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना चिखलातून आणि लांबच्या मार्गाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या दुरवस्थेमुळे ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण घेणे अवघड झाले असून पालकांमध्ये तीव्र संताप आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Source link
टाकळी-बाजारसावंगी रस्ता पहिल्या पावसात बंद:वाहनधारकांची गैरसोय, अपुर्ण कामांमुळे नागरिकांमधून नाराजी