![]()
जुने शहरातील ३२२ वर्षे पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आषाढीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा बुधवारी श्रीगणेशा झाला. अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदा ९३ वे वर्ष आहे. या सप्ताहाचा समारोप बुधवार, २९ जुलै (आषाढ शुद्ध पौर्णिमा) रोजी होणार आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू झालेल्या या सप्ताहात भक्त पंढरीनाथाचा जयघोष करत माऊलीच्या भक्तीत तल्लीन होत आहेत. विठ्ठल मंदिरात १९३३ पासून अखंड हरिनाम सप्ताहासह इतरही धार्मिक कार्यक्रम, उत्सवांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. सप्ताहात रोज सकाळी ६ वाजेपासून ३५ पेक्षा जास्त भजन मंडळे सेवा देत आहेत. तसेच प्रहरातही भजन मंडळे सहभाग नोंदवत आहेत. सप्ताहाच्या यशस्वितेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या यशस्वितेसाठी सर्व पदाधिकारी-सभासद परिश्रम घेत असल्याचे व्यवस्थापक रमेश अलकरी यांनी कळवले आहे. सप्ताहात अखंड प्रहर म्हणजेच वीणावादन, हरिपाठ, भजन, भक्तीसंगीत कार्यक्रम, कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. मंदिरात राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. नंदिनीताई कडुस्कर यांचे रोज रात्री ८ ते १० या वेळी कीर्तन होत आहे. सप्ताहभर विविध भजनी मंडळांची भजनसेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत अखंड होणार आहे. रोज सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात भक्तांना आनंदाची अनुभूती येणार आहे. गुरुवार, ३० जुलै रोजी गोपाल काल्याचे कीर्तन सकाळी १० वाजता होणार आहे. दहिहंडी व गोपाल काल्याचा कार्यक्रम दुपारी १२ वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता महापूजा होईल. राजेश्वर नगरीत निघणार मिरवणूक : आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता श्री विठ्ठल-रुख्मिणी यांची शोभायात्रा शहरात निघणार आहे. या शोभायात्रेत वारकरी भजनी मंडळ, दिंडी, सांप्रदायिक भजनी मंडळ, महिला मंडळ यांचा सहभाग राहणार आहे. तसेच शोभायात्रेनंतर रात्री ८.३० वाजता महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. आज आशीर्वाद समारोह गत ९३ वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात आणि ३२२ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्री विठ्ठल मंदिर रुक्मिणी मंदिर संस्थानच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे भरीव योगदान आहे. या दानशूर मान्यवरांना सन्मान सोहळा गुरुवार, २३ जुलै रोजी हा होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ७ वाजतापर्यंत विठ्ठल मंदिर प्रांगणात होणार आहे. हा आशीर्वाद समारंभ शंकरभारती स्वामी महाराज संकेश्वर यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
Source link
टाळ मृदंगाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताहाचा श्रीगणेशा:आषाढी एकादशीनिमित्त हरिनामाचा जागर; 29 रोजी समारोप