Headlines

परीक्षेतील भ्रष्टाचारविरोधात एल्गार; विद्यार्थ्यांचे आंदोलन:आंदोलनावरील कारवाईचा निषेध; पावसातही एकवटली तरुणाई‎




एमपीएससी, यूपीएससी, नीट, एसएससी, शिक्षक भरतीसह विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहार, भ्रष्टाचारविरोधात बुधवारी तरुणाईने एल्गार पुकारला. विद्यार्थी- विद्यार्थिनींनी भरपावसातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटत नीट पेपर फुटीबाबत कठोर कारवाईसह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली. दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थी- विद्यार्थिनीवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवत स्वतंत्र चौकशीचा आग्रह आंदोलकांनी धरला. विद्यार्थी- विद्यार्थिनींची संख्या लक्षात, त्यांची आक्रमकता लक्षात घेत आंदोलनस्थळी सिटी कोतवाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत भावना व्यक्त केल्या. नीट पेपर फुटीवरुन दिल्ली येथील आंदोलनाचे पडसाद अकोल्यात या आठवड्यात दुसऱ्यांदा उमटले. प्रथम सोमवारी राजकीय पक्ष, शैक्षणिक, सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यानंतर बुधवारी विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी फारसा गाजावाजा न करता थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन पुकारले. विशिष्ट संघटना किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा न घेता तरुणाई केवळ विद्यार्थी- विद्यार्थिनी आपल्या हक्कांसाठी एकत्र आले आणि घोषणाबाजी करत मागण्या लावून धरल्या. दिल्लीतील आंदोलनाचे तीव्र पडसाद अकोल्यात उमटू नयेत, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत असल्याचे दिसून आले. आंदोलक विद्यार्थी- विद्यार्थिनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयाकडे निघाले. मात्र पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यद्वार बंद करत बंदोबस्तही वाढवला. ४ ते ५ जण आमच्यासोबत चला व निवेदन द्या, असे पोलिसांचे म्हणण होते. मात्र सर्वच आंदोलक आतमध्ये जाण्यावर ठाम होते. एकूणच स्थिती लक्षात घेता युवकांनी विद्यार्थी-विद्यार्थ िनींची समजूत काढली. चिघळलेले आंदोलन दडपणे सरकारी यंत्रणांना सहज शक्य असते; त्यामुळे आपण शांततेच्या मार्गाने पुढे जाऊ, असे युवक म्हणाले. त्यानंतर मोजके विद्यार्थी निवेदन देण्यासाठी गेले. शिक्षणाचे वाढते खासगीकरण रोखून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे व समान दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ठोस धोरण जाहीर करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. परीक्षा, भरती व शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा कोणत्या कालमर्यादेत होतील, याबाबत स्पष्ट कृती आराखडा जाहीर होणे आवश्यक आहे, असेही विद्यार्थी म्हणाले. यंत्रणा सुधारण्यासाठी आग्रह विद्यार्थ्यांचे हे आंदोलन केवळ एखाद्या परीक्षेपुरते मर्यादित नसून, संपूर्ण शिक्षण आणि भरती व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्याची मागणी काही आंदोलकांच्या बोलण्यातून समोर आली. पेपरफुटी, भरतीतील विलंब आणि भ्रष्टाचारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. त्यामुळे पारदर्शक व कालबद्ध परीक्षा प्रणाली उभारणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे युवक म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *