![]()
मनपाच्या सर्वसाधारण सभेतील आणि स्थायी समितीच्या सभेतील ठरावांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आजवर विविध सभांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची प्रशासनाकडून काय अंमलबजावणी झाली, तसेच विकासकामांची प्रगती कुठपर्यंत पोहोचली, याचा आढावा घेण्यात आला. अ
.
या बैठकीत नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग आणि एनयूएलएम विभागांतर्गत झालेल्या ठरावांवर चर्चा झाली. सभापती विजय अग्रवाल यांनी तिन्ही विभागांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी कामे करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य व इतर सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. शहराचा विकास करताना कोणत्याही फाइल्स किंवा तक्रारी प्रलंबित राहू नयेत, अशी तंबी यावेळी लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना दिली. या बैठकीला मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, सहाय्यक आयुक्त गणेश शहाणे, विठ्ठल देवकते, राजेश सरप, नगरसेवक नितीन ताकवाले, अमोल मोहोकार, हर्षद भांबेरे, माजी नगरसेवक तुषार भिरड, सहाय्यक नगररचनाकार मृणालिनी मानतकर, संदीप गावंडे, अनिल बिडवे यांच्यासह विविध विभागांचे कनिष्ठ अभियंता व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
अतिक्रमण, नालेसफाईवर जास्त लक्ष देण्याची सूचना शहरातील मुख्य रस्त्यांवरील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व कनिष्ठ अभियंत्यांनी आपापल्या क्षेत्रात पाहणी करून विनापरवानगी सुरू असलेल्या बांधकामांना तत्काळ नोटिस देऊन काम थांबवावे, असे सांगण्यात आले. आगामी पावसाळा लक्षात घेता, सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नालेसफाईच्या कामात अधिक लक्ष घालून काम चोख करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.